युती, आघाडी की लढणार स्वतंत्र?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील पेच

उस्मानाबाद - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी काही तालुक्‍यांत आघाडी, युती, तर काही तालुक्‍यांत बिघाडीचे संकेत आहेत. परस्पर हितासाठी शत्रूला मित्र करण्याची भूमिका राजकीय पुढाऱ्यांकडून घेतली जात असल्याने जिल्ह्यात आगामी निवडणुकीसाठी कसे चित्र असणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे. 

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील पेच

उस्मानाबाद - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी काही तालुक्‍यांत आघाडी, युती, तर काही तालुक्‍यांत बिघाडीचे संकेत आहेत. परस्पर हितासाठी शत्रूला मित्र करण्याची भूमिका राजकीय पुढाऱ्यांकडून घेतली जात असल्याने जिल्ह्यात आगामी निवडणुकीसाठी कसे चित्र असणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे. 

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आखाड्यात आता दररोज नवीन मित्र तयार होतात, तशी नवीन शत्रूंची संख्याही वाढत आहे. आपल्या शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, अशी स्थिती जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांत असल्याने युती, आघाड्यांत बिघाडी होणार की सर्वजण स्वतंत्र लढणार याची उत्सुकता जिल्ह्यातील नागरिकांना लागली आहे. उस्मानाबाद, कळंब तालुक्‍यांत राष्ट्रवादी आणि शिवसेना एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. यापूर्वीच्या अनेक निवडणुकींत शिवसेना व काँग्रेसने हातमिळवणी करून राष्ट्रवादीला एकाकी पाडले होते. गेल्या काही दिवसांपासून भाजपचा जोर वाढत आहे. जिल्हा बॅंकेत मात्र राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्‍यांतील नेते युती, आघाडी की स्वतंत्र लढणार, याबाबत अनिश्‍चितता आहे. परंडा, भूम तालुक्‍यांत राष्ट्रवादीसह शिवसेनेचेही प्राबल्य आहे.

यापूर्वीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात सर्वपक्षीय एकवटल्याचे चित्र होते. आता भाजपनेही ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भाजपला सोबत घेऊन महाघाडी होणार की सर्वजण अस्तित्वासाठी झगडणार, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. वाशी तालुक्‍यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची जवळीक आहे. त्यामुळे आघाडी होणार बिघडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुळजापूरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि आमदार मधुकरराव चव्हाण यांच्यातील परस्पर विरोधामुळे आघाडी होणार नसल्याचे सर्वश्रुत आहे. या तालुक्‍यात राष्ट्रवादी भाजपला सोबत घेणार की सर्वजण स्वतंत्र लढणार याची उत्सुकता मतदारांना लागली आहे. उमरगा तालुक्‍यात शिवसेनेचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड आणि काँग्रेसचे आमदार बसवराज पाटील एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. काँग्रेसकडून भारतीय जनता पक्षाला जवळ केले जाण्याची शक्‍यता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पालिका निवडणुकीतही असेच चित्र होते. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी आघाडी, काही ठिकाणी युती, तर काही ठिकाणी परस्परांना पाडण्याचे प्रयत्न होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत वर्चस्व मिळविण्यासाठी कोण कोणाची साथ घेणार की स्वतंत्र लढणार, हे येणारा काळच ठरविणार आहे.

Web Title: osmanabad zp & panchyat committee election