...अन्यथा शेतकरी करणार ‘मै भी गुन्हेगार’ आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

आपल्या देशात जीएम कापूस, सोयाबीन, मका, वांगी, मोहरी पिके घेण्यास बंदी आहे. मात्र, जीएम सोयाबीनपासून तयार केलेले तेल सरकार अधिकृतपणे आयात करते. हे चुकीचे आहे. भारतात जनुक सुधारित बियाणांना परवानगी मिळावी, गुरुवारी (ता. २८) मंत्र्यांना ई-मेल पाठवून आंदोलन केले जाणार आहे.

हिंगोली : भारतात जनुक सुधारित बियाणांना परवानगी मिळावी, यासाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेतर्फे हजारो शेतकऱ्यांमार्फत गुरुवारी (ता. २८) केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांना ई-मेल पाठवून आंदोलन केले जाणार आहे.

जगभरामध्ये जनुक सुधारित (जेनिटिकली मॉडिफाईड) बियाणे वापरले जाते. त्या आधारे कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पादन घेतले जात आहे. भारतात मात्र फक्त कापसाच्या बीजी- २ या जीएम वाणानंतर कोणत्याही वाणास किंवा पिकाच्या परवानगी देण्यात आलेली नाही. कपाशीमध्ये तणनाशक रोधक बियाणे उपलब्ध आहे. 

हेही वाचाcovid-19 : पुन्हा मुंबई कनेक्शन; हिंगोलीत आणखी चौघे पॉझिटिव्ह

भारतात बियाणे वापरण्यास बंदी

एका फवारणीने तणाचा बंदोबस्त होतो. खुरपणीचा हजारो रुपयांचा खर्चही वाचतो. शिवाय उत्पादनही चांगले येते. भारतात मात्र हे बियाणे वापरण्यास बंदी आहे. आपल्या देशात जीएम कापूस, सोयाबीन, मका, वांगी, मोहरी पिके घेण्यास बंदी आहे. मात्र, जीएम सोयाबीनपासून तयार केलेले तेल सरकार अधिकृतपणे आयात करते. हे चुकीचे आहे.

ई - मेल पाठवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न

 मागील वर्षी अकोली जहागीर येथे तणनाशकरोधक कापूस बियाणाची जाहीर लागवड करत किसान सत्याग्रह करून सविनय कायदेभंग केला होता. मात्र, सरकारने संघटनेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. या वर्षी सुद्धा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी (ता. २८) संघटनेचे स्व. अजित नरदे यांच्या जयंती दिवशी पंतप्रधान, मुख्यमंत्री, कृषिमंत्री, पर्यावरण मंत्री व गृहमंत्र्यांना ई - मेल पाठवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

हजारो शेतकरी पाठविणार ई-मेल

आठ दिवसांत जीएम बियाणांना परवानगी दिली नाही तर ‘मै भी गुन्हेगार’ आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे संघटनेचे जिल्हाप्रमुख देविप्रसाद ढोबळे, स्‍वतंत्र भारत पक्षाचे जिल्‍हा प्रमुख उत्तमराव वावळे, दिगंबरराव आहेर, स्वभाव कागणे, शेषराव राखुंडे, प्रल्हाद राखुंडे, खंडोबाराव नाईक आदींनी सांगितले आहे.

कापूस नोंदणीसाठी मुदतवाढ द्या : दत्ता बोंढारे 

आखाडा बाळापूर : आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत बहुतांश शेतकऱ्यांची कापूस विक्री करण्यासाठीची नोंदणी झाली नाही. त्यामुळे नोंदणीअभावी कापूस घरातच पडून असून या शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी नोंदणी करता यावी, यासाठी कापूस विक्री नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्ता बोंढारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सीसीआयकडून कापूस खरेदी 

जिल्ह्यात सीसीआयकडून कापूस खरेदी करण्यात येत आहे. त्यासाठी नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार बहुतांश शेतकऱ्यांनी नोंदणी केली. मात्र, मुदतीमध्ये कापूस विक्री करता आला नाही.

येथे क्लिक कराहिंगोलीत हळद अडीच हजारांनी उतरली

हजारो क्विंटल कापूस शिल्लक

 तसेच अनेक शेतकऱ्यांना संचारबंदीमुळे मुदतीत कापूस विक्रीसाठी नेता आला नाही. शिवाय अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करता आली नाही. सध्याच्या स्थितीमध्ये आखाडा बाळापूर बाजार समितींतर्गत हजारो क्विंटल कापूस विक्रीसाठी शिल्लक आहे. सीसीआयने कापूस खरेदी केल्यास शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार आहे. 

खासगी बाजारात कमी दराने खरेदी

खासगी बाजारात कापूस विक्री केल्यास कमी भावाने विकावा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडणार आहे. त्यामुळे कापूस नोंदणीला तसेच खरेदीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी सभापती श्री. बोंढारे यांनी केली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... otherwise the farmers will start a 'I am also a criminal' movement Hingoli news