esakal | लिंगायत आरक्षणाचा प्रश्न आमचे सरकारच सोडवेल
sakal

बोलून बातमी शोधा

लातूर : लिंगायत महासंघाच्या लिंगायत समाज राज्यव्यापी आरक्षण अधिवेशनात एकत्र आलेले अमित देशमुख, चंद्रकांत खैरे, जितेंद्र आव्हाड, प्रा. सुदर्शन बिरादार.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची ग्वाही 

लिंगायत आरक्षणाचा प्रश्न आमचे सरकारच सोडवेल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर : लिंगायत समाजाला आरक्षण देणार, असा शब्द महायुती सरकारने दिला; पण तो पाळला नाही. पण आमच्या पक्षाचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही लिंगायत समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्न तातडीने सोडवू, असे आश्वासन कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी रविवारी येथे दिले. 


लिंगायत समाज राज्यव्यापी आरक्षण अधिवेशनाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, आमदार अमित देशमुख, विक्रम काळे उपस्थित होते. काळे म्हणाले, सरकारने लिंगायत बांधवांबरोबरच धनगर आणि मुस्लिम बांधवांना आरक्षण दिले नाही. धनगर समाजाला तर पहिल्या कॅबिनेटमध्येच आरक्षण देण्याचा निर्णय घेणार होते. अशा अनेक घोषणा सध्याच्या सरकारने केल्या; पण शब्द पाळला नाही. मुख्यमंत्री 31 ऑगस्ट रोजी लातुरात येणार आहेत. त्याआधीच त्यांनी आरक्षणाचा निर्णय घ्यावा. राज्यात आमचे सरकार आले तर आम्ही हा प्रश्न लगेच सोडवू. 


आव्हाड म्हणाले, एका रात्रीत 370 कलम काढून टाकले. त्याप्रमाणे आरक्षणसुद्धा एका रात्रीत काढून टाकले जाऊ शकते. या सरकारचा काही नेम नाही. आरक्षणाच्या बाबतीत मोहन भागवत यांनी जे विधान केले आहे त्याचा अर्थ काय काढायचा? आरक्षणाच्या बाजूने कोण आहे आणि विरोधात कोण, हे समाजाने ओळखायला हवे. आम्हाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे लिंगायत समाजाने सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगायला हवे. पण सरकारने अद्याप या समाजाचा प्रश्न सोडवला नाही. आमचे सरकार सत्तेत आल्यानंतरच हा प्रश्न सुटणार आहे. 

कॉमा द्या, नाहीतर कोमात जाल 
देशमुख म्हणाले, वाणी नावाला असलेले आरक्षण लिंगायत व हिंदू लिंगायतांना लागू व्हावे. त्यासाठी शुद्धिपत्रक काढावे, एवढीच लिंगायत समाजाची मागणी आहे. ती पूर्ण करण्याची संधी महायुतीला मिळाली आहे. पण अद्याप या मागणीचा विचार झाला नाही. इशारा देण्यात शिवसेनेचा हात कोणीही धरू शकत नाही. लिंगायत समाजाला आरक्षण द्या; नाही तर युती होणार नाही, असा इशारा शिवसेनेने द्यायला हवा. शुद्धिपत्रक काढताना सरकारला केवळ कॉमा (स्वल्पविराम) द्यायचा आहे. तो दिला नाही तर जनता कोमात घालवेल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 


 

loading image
go to top