पडेगावमध्ये कचऱ्याच्या ट्रकवर केली दगडफेक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

पोलिस बंदोबस्तात दिवसभरात 60 ट्रक कचरा उचलला

पोलिस बंदोबस्तात दिवसभरात 60 ट्रक कचरा उचलला
औरंगाबाद - शहरातील रस्त्यांवर हजारो टन कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येताच महापालिका प्रशासनाने नव्या जोमाने कचरा उचलण्याचे काम सुरू केले आहे. मंगळवारी (ता. 17) पहाटेपासून 60 ट्रक कचरा उचलून चिकलठाणा व पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्रात टाकण्यात आला; मात्र पडेगाव येथे नागरिकांनी कचऱ्याला विरोध करीत दगडफेक केली. त्यात एका ट्रकच्या काचा फुटून नुकसान झाले. त्यानंतर मात्र पोलिस बंदोबस्तात कचरा टाकण्यात आला.

शहरातील कचराकोंडीला पाच महिने पूर्ण झाले आहेत; मात्र अद्याप रस्त्यावर हजारो टन कचरा पडून आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे कचऱ्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली असून, माश्‍यांचा त्रास वाढल्यामुळे रोगराईची भीती व्यक्त केली जात आहे. साथीच्या आजाराच्या पार्श्‍वभूमीवर कंट्रोल रूम तयार केल्यानंतर आता कचरा उचलण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सोमवारी (ता. 16) रात्रीपासून कचऱ्याच्या गाड्या भरून ठेवण्यात आल्या होत्या. पहाटे चार वाजेपासून पडेगाव व चिकलठाणा येथे या गाड्या पाठविण्यात आल्या. पडेगाव येथे सकाळी विरोध झाल्याने पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला; मात्र पोलिस येताच विरोध करणाऱ्यांनी पलायन केले. त्यानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास अन्सारी कॉलनी येथील तरुणांनी कचऱ्याने भरलेल्या ट्रकवर दगडफेक केली, त्यामुळे खळबळ उडाली. पुन्हा मोठा फौजफाटा घेऊन बंदोबस्तातच कचरा या ठिकाणी टाकण्यात आला. सायंकाळपर्यंत दोनशे टन कचरा उचलण्यात आला होता.

कचऱ्याला सुरवातीपासून शिवसेनेचा विरोध होत आहे. आमदार संदीपान भुमरे यांनी सुरवात केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी पिशोर येथेदेखील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कचऱ्याच्या गाड्या अडविल्या होत्या. मंगळवारी शिवसेना नगरसेविकेच्या पतीने कचऱ्याच्या गाड्या काही काळ अडवून धरल्या होत्या.

Web Title: padegaon garbage truck attack police