लातूर जिल्हा प्रशासनाकडून पदमाळे गाव दत्तक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

महापुरामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. लातूरकर पूरग्रस्तांना मदत करीत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मिरज तालुक्‍यातील पदमाळे हे गाव दत्तक घेण्यात आले असून, या गावाचे पूर्ण पुनर्वसन करून देण्यात येणार आहे. पुनर्वसनासाठी स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या नागरिकांनी स्वयंप्रेरणेने पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी येथे केले. 

लातूरः महापुरामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. लातूरकर पूरग्रस्तांना मदत करीत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मिरज तालुक्‍यातील पदमाळे हे गाव दत्तक घेण्यात आले असून, या गावाचे पूर्ण पुनर्वसन करून देण्यात येणार आहे. पुनर्वसनासाठी स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या नागरिकांनी स्वयंप्रेरणेने पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी येथे केले. 

बाभळगाव येथील पोलिस मुख्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातुरे, महापौर सुरेश पवार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन ईटनकर, महापालिका आयुक्त एम. डी. सिंह, पोलिस अधीक्षक राजेंद्र माने, पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य काकासाहेब डोळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी सुनील यादव यांच्यासह इतर पदाधिकारी अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक उपस्थित होते. 

गेल्या आठवड्यात सांगली, कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे महापूर येऊन या भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुष्काळी परिस्थिती असतानाही लातूरकरांनी सांगलीकरांना मदतीचा हात दिला आहे. जिल्हा प्रशासनाने सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्‍यातील पूरग्रस्त पदमाळे गाव संपूर्ण पुनर्वसनासाठी दत्तक घेतले आहे. लातूरला 2016 च्या दुष्काळी परिस्थितीमध्ये रेल्वेने पाणी देऊन मैत्रीचा हात दिलेल्या सांगलीकरांचे या संकटाच्या काळात हे गाव पूर्णपणे पुनर्वसन करून दिले जाणार आहे, असे ते म्हणाले.

जिल्ह्यात अंत्योदय योजनेचे 4 हजार 400 आणि प्राधान्य कुटुंब योजनेचे 40 हजार 400 असे एकूण 44 हजार 800 नवीन लाभार्थी शोधण्यात आलेले आहेत. राज्यात लातूर जिल्हा पहिला आहे. या लाभार्थींना नवीन कार्ड वाटप करून ता. दोन सप्टेंबरपासून या योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे. या अभियानात आजपर्यंत गॅसजोडणीसाठी 40 हजार अर्ज प्राप्त झालेले असून, यातील दहा हजार लाभार्थींना गॅसजोडणी दिलेली आहे. 

जिल्ह्यात दुष्काळ आहे. जिल्हा प्रशासनामार्फत टॅंकर, विंधन विहीर, विहीर आदी अधिग्रहणे करून पाणीपुरवठा केला जात आहे. या दुष्काळी परिस्थितीत कोणीही खचून जाऊ नये. धीर धरावा. शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी आहे

. तसेच नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा. राज्यात मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियान राबवले जात आहे. यात जिल्ह्याने 6 हजार 24 नेत्रशस्त्रक्रिया करून उद्दिष्टाच्या 117 टक्के काम करून राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. मोतीबिंदूमुक्त लातूर जिल्ह्याकडे आपली वाटचाल सुरू आहे, असे निलंगेकर म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार वंजारी यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Padmale village adopted by Latur District Administration