गृहउद्योगातून मिळाला महिलांना रोजगार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पैठण - संत एकनाथ सहकारी साखर कारखाना परिसरातील पुष्पाताई गव्हाणे यांनी बेरोजगार महिलांसाठी २०११ मध्ये सुरू केलेल्या गृहउद्योग व्यवसायाला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. राज्यातील मुंबई, नागपूर या राजधानीच्या शहरांसह भुसावळ, पुणे येथील व्यावसायिकांची ग्रामीण भागातील गृहउद्योगाच्या खमंग चवीचा स्वाद देणारे विविध पदार्थ, मसाल्यांना सर्वत्र मागणी आहे. 

श्रीमती गव्हाणे यांनी सुरू केलेल्या गृहउद्योगातून अन्नपूर्णा महिला बचत गटाची स्थापना झाली. त्यातून या भागातील बेरोजगार महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली. ग्रामीण भागातून मोठमोठ्या शहरांत नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झालेल्या पैठण तालुक्‍यातील नागरिकांकडून हे पदार्थ, मसाल्याला मागणी वाढत आहे.  मागणीनुसार गहू आटा, उडीद, मूग, नागली, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मिक्‍स मसाला, तसेच विविध प्रकारचे पापड, बटाटा चिप्स, साबूदाणा पापड, बटाटा चकली, जवस, तीळ, खोबऱ्याची चटणी हे पुरविण्याची व्यवस्था केली जाते. कैरी, लिंबाचे लोणचे हे या उद्योगाचे खास वैशिष्ट्य. मसाल्याचे लाल तिखट, कांदा-लसूण, गरम मसाला हा ग्रामीण चवीचा मसाला चांगली चव देत असल्यामुळे जास्तीची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.

लघुउद्योगाला भूखंड देण्याची मागणी 
संत एकनाथ सहकारी साखर कारखाना परिसराच्या दोन किलोमीटर अंतरावर पैठण औद्योगिक वसाहत आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नुकतेच महिला उद्योगासाठी औद्योगिक वसाहतीत भूखंड देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या लघुउद्योगाला भूखंड मिळावा, अशी मागणी श्रीमती गव्हाणे यांनी केली. याबाबत शिवसेना नेते तथा खासदार चंद्रकांत खैरे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

आतापर्यंत भारतीय नारी ही समाजव्यवस्थेच्या बंधनात राहिली आहे. तिला मोकळा श्‍वास घेता आला नाही. चूल आणि मूल हेच तिचे विश्‍व व व्रतवैकल्य यातच ती गुंतून पडली आहे. या फेऱ्यातून बाहेर काढण्यासाठी हा लघुउद्योग सुरू केला. महिलांना रोजगार देऊन, त्यातून स्वावलंबी बनविण्याचा हा प्रयत्न आहे. 
- पुष्पाताई गव्हाणे.

Web Title: paithan marathwada news home business women employment