उलटलेल्या टॅंकरमधील पामतेल नेण्यासाठी झुंबड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

अणदूर (जि. उस्मानाबाद) - कच्च्या पामतेलाची वाहतूक करणारा टॅंकर उलटल्याने तेल रस्त्यावर सांडले. ते घेण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांची झुंबड उडाली होती.

अणदूर (जि. उस्मानाबाद) - कच्च्या पामतेलाची वाहतूक करणारा टॅंकर उलटल्याने तेल रस्त्यावर सांडले. ते घेण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांची झुंबड उडाली होती.

प्रणया लॉजिस्टिक कंपनीचा टॅंकर आंध्र प्रदेशातील चित्तमपल्ली येथून खोपोलीकडे (मुंबई) पामतेल घेऊन निघाला होता. पुणे- हैदराबाद महामार्गावरील बोर्डे पुलाच्या कठड्याला बुधवारी पहाटे धडक बसल्याने टॅंकरची पुढील दोन्ही चाके निखळून टॅंकर उलटला. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झाली नाही. टॅंकरमधील 22 टन पामतेल रस्त्यावर सांडले. सकाळी अणदूरसह परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. घागरी, बादल्या, अन्य भांडे घेऊन अनेक ग्रामस्थ, किरकोळ खाद्यपदार्थ व्यावसायिकांनी धाव घेतली आणि तेल भरून नेले. काहींनी नळाचे पाईप आणून टॅंकरमध्ये टाकले आणि तेल भरून घेतले.

पामतेलामुळे रस्ता निसरडा होऊन धोकादायक बनल्याने दिवसभर वाहतूक सावकाश सुरू होती. दरम्यान, टॅंकरमधील कच्चे पामतेल प्रक्रिया करून पॅंकिंगसाठी नेले जात होते. कच्चे तेल खाण्यायोग्य नसून, नागरिकांनी ते खाऊ नये, असे आवाहन प्रणया लॉजिस्टिकचे व्यवस्थापक संदीप शर्मा व नळदुर्ग पोलिसांनी केले.

अणदूर (जि. उस्मानाबाद) - उलटलेल्या टॅंकरमधील पामतेल मिळविण्यासाठी उडालेली झुंबड.

Web Title: Pamoil Tanker Turndown Accident