esakal | 'वारीला परवानगी नाही म्हणजे हिंदूंच्या आस्मितेवर घाला'
sakal

बोलून बातमी शोधा

parbhani

'वारीला परवानगी नाही म्हणजे हिंदूंच्या आस्मितेवर घाला'

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी: साडेसातशे वर्षाची परंपरा असलेल्या पंढरपुरच्या आषाढी वारीला सलग दुसऱ्या वर्षीही राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. हा तमाम हिंदूंच्या आस्मितेवर घाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने पंढरपूर वारीस परवानगी द्यावी अन्यथा येत्या १७ जुलै रोजी भजन आंदोलन केले जाणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत मंत्री अनंत पांडे यांनी गुरुवारी (ता.१५) पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात कोरोना संसर्गामुळे राज्य शासनाने गतवर्षीसह याही वर्षी पंढरपुर येथील आषाढी वारीला परवानगी नाकारली आहे. वारीला परवानगी द्यावी अशी मागणी वारकरी लोकांमधून जोर धरू लागली आहे. यासंदर्भात बोलतांना श्री.पांडे म्हणाले, शेकडो वर्षाची पायी वारीची परंपरा मुघलांच्या आणि इंग्रजांच्या काळातही आबाधित होती. परंतू गेल्या वर्षी पायी वारीची परंपरा खंडीत झाली. वारकऱ्यांच्या मुलभूत अधिकारांवर गदा का आणण्यात येत आहे, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा: Petrol Diesel Price: इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस

मानाच्या सात पालख्यासोबत साधारणपणे ३५० ते ४०० पालख्या पंढरपुरात दाखल होतात. त्यात केवळ एका पालखीमागे तीन ते चार वारकऱ्यांना वारी करु द्यावी, मानाच्या पालखी सोबत ५०० वाऱ्यांना पायी जाण्याची परवानगी द्यावी, दिवसा अडचण होत असेल तर रात्रीची पायी वारी करू द्यावी आदी मागण्या यावेळी श्री. पांडे यांनी बोलून दाखविल्या. या मागण्या राज्य शासनाने तातडीने पूर्ण करून वारीस परवानगी द्यावी अन्यथा येत्या ता. १७ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच सर्व तहसिल कार्यालयासमोर भजन आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारचा निषेध केला जाणार आहे असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा: IVF तंत्रज्ञानाच्या मदतीने देशी गोवंशवृद्धी, १३ कालवडींचा जन्म

या आंदोलनानंतरही परवानगी न मिळाल्यास ता. २० जुलै रोजी गावागावात प्रति पंढरपुर साकारले जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्र्यंबक महाराज दस्तापूरकर, प्रभु महाराज मोरे, बालासाहेब महाराज मोरे, गोविंद महाराज पोंढे गुरुजी, भगवान महाराज रिडजकर, सुरेश महाराज गायकवाड, सुभाष महाराज उमरेकर, बाळू महाराज उमरीकर, प्रल्हादराव कानडे, बापुराव सूर्यवंशी, तुकाराम दैठणकर, शिवप्रसाद कोरे, सुरेंद्र शहाणे यांची उपस्थिती होती.

loading image