पैसे कसे खायचे, आपल्या लोकांना कळत नाही- पंकजा मुंडे

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जानेवारी 2017

आपल्या लोकांना पैसा कसा खायचा ते कळत नाही, कोठेही सह्या करतात असे त्यांनी वक्तव्य केले आहे. तसेच प्रत्येक क्षण विकास कामी लावत असल्याने तुमच्याशी संवाद साधता येत नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

बीड - आपल्या वक्तव्याने नेहमी राजकीय पटल स्वत:भोवती चर्चेत ठेवणाऱ्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडेंनी पुन्हा एकदा वक्तव्य केले आहे.

आपल्या लोकांना पैसे कसे खायचे कळत नाही, कोठेही सह्या करतात, मला विचारल्याशिवाय जिल्ह्यात कोणताच मंत्री निधी देत नाही. मुख्यमंत्रीही म्हणतात, पंकजाताईंना विचारून घ्या, त्यांचे मत काय असे, अशा त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

नेकनूर येथे गुरुवारी (ता. चार) विकास कामांची सुरवात पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाली. नेकनूर येथील वादग्रस्त पाणी योजनेवरून बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, नेकनूरचा पाणी प्रश्‍न आपण सोडवू. इथल्या योजनेमुळे "चोर सोडून सन्याशाला फाशी' असा प्रकार झाला आहे. मात्र, आपल्या लोकांना पैसा कसा खायचा ते कळत नाही, कोठेही सह्या करतात असे त्यांनी वक्तव्य केले आहे. तसेच प्रत्येक क्षण विकास कामी लावत असल्याने तुमच्याशी संवाद साधता येत नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. जिल्ह्यात आपल्याला विचारल्याशिवाय एकही मंत्री निधी देत नाही. बीड म्हटले की फाईल माझ्याकडे पाठवतात. मुख्यमंत्रीही "पंकजाताईंना विचारुन घ्या, त्यांचे मत काय आहे' असे सांगतात असेही त्या म्हणाल्या. सत्ता काय, असते याचे हे उदाहरण असल्याचे सांगून जिल्ह्यात विविध विभागांमार्फत मोठ्या प्रमाणावर निधी आल्याचे त्यांनी म्हटले. राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्राकडून 2600 कोटी रुपयांचा निधी आल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Pankaja Munde controversial statement