समान पाण्याच्या फाईलला आता स्वाक्षरीची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

परिस्थिती गंभीर
शहर अभियंता एस. डी. पानझडे यांनी नुकतीच जायकवाडी येथील पाणीपुरवठा यंत्रणेची पाहणी केली आहे. धरणातून जाणाऱ्या मुख्य कालव्याद्वारे पंपगृहापर्यंत पाणी आणले जायचे त्या पाण्याचा प्रवाह मंदावल्याने ॲप्रोच कॅनॉलच्या प्रवाहापासून ५०० मीटर लांबून आपत्कालीन फ्लोटिंग पंपाच्या मदतीने पाणी उपसा करून पंपगृहापर्यंत पाणी आणण्याची कसरत करावी लागत आहे. त्यातच फुटबॉलमध्ये सतत अडकणारे गवत, विद्युत यंत्रणेत होणारे बिघाड, धरणाची खालावलेली पातळी, हे सर्व चित्र पहिल्यानंतर परिस्थिती अत्यंत भीषण झालेली आहे.

औरंगाबाद - राज्यमंत्री अतुल सावे यांच्याशी झालेल्या भेटीत संपूर्ण शहराला समान पाणीवाटप करण्याचे आणि दीड दिवसात याचे नियोजन करू, असे आश्‍वासन आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी संचिका तयार करून ठेवली आहे; मात्र या संचिकेला आयुक्‍तांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा आहे. 

महापालिकेच्या जायकवाडीत ४५ एमएलडी आणि १०० एमएलडी अशा दोन पाणीपुरवठा योजना आहेत. येथून शहरासाठी फारोळा मार्गे पाणी पोचवण्यात येते; मात्र सध्या नाथसागराची पाणीपातळी मृत साठ्यात गेल्याने पाणी उपसा क्षमतेपेक्षा कमी होत आहे. परिणामी जायकवाडी धरणातून शहराला होणारा पाणीपुरवठा घट झाली आहे. परिणामी काही भागांत चार ते सहा दिवसांआड तर काही भागांत तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेषतः सिडको-हडकोमध्ये परिस्थिती गंभीर असल्याचे चित्र पाहायला मिळते. पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर राज्यमंत्री अतुल सावे यांनी नुकतीच आयुक्त निपुण विनायक यांची भेट घेतली होती. 

या भेटीनंतर आयुक्तांनी दीड दिवसात समान पाणीवाटपाचे नियोजन करण्याचे आश्वासन राज्यमंत्र्यांना दिले होते. याची जबाबदारी शहर अभियंता एस.डी. पानझडे यांच्यावर सोपविण्यात आली. त्यानुसार त्यांनी समान पाणीवाटपाचे नियोजन केले असून, यात काही भागांचा गॅप वाढवून समान पाणीवाटप करण्यात येणार असल्याचे समजते. समान पाणीवाटपाची संचिका आता आयुक्तांसमोर ठेवण्यात येणार आहे. आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर या नियोजनाची अंमलबजावणी होईल. आयुक्त तीन दिवस सुटीवर असल्याने सोमवारी आयुक्तांसमोर ही संचिका जाईल. त्यांच्या मान्यतेनंतर प्रत्यक्षात समान पाणीवाटप सुरू होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parallel water line issue water supply