खानावळचालकाच्या मुलीचे "आदर्श' यश

आनंद खर्डेकर
बुधवार, 14 जून 2017

आईवडिलांना हातभार लावीत विशाखाने मिळविले 96 टक्‍के

आईवडिलांना हातभार लावीत विशाखाने मिळविले 96 टक्‍के
परंडा - घरची आर्थिक परिस्थिती जेमतेमच...आई-वडील घरोघरी जेवणाचा डबा देत उदरनिर्वाह चालवतात... अभ्यास सोडून आई-वडिलांची मदत करणे ओघाने आलेच.. अशा प्रतिकूल परिस्थितीतही कोणतीही तक्रार न करता येथील विशाखा दत्तात्रेय खंबायतने दहावीच्या परीक्षेत तब्बल 96 टक्‍के गुण मिळवून नावलौकिक मिळविला.

परंडा येथील दत्तात्रय खंबायत यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत साधारण आहे. पती-पत्नी दोघेही उदरनिर्वाहासाठी घरगुती मेस चालवून डबे घरोघरी देतात. त्यांची मुलगी विशाखा घरकामासह या कामातही आई-वडिलांना मदत करते. परंडा येथील बावची माध्यमिक विद्यालयात शिकणारी विशाखा अभ्यासातही हुशार आहे. यंदा दहावीचे वर्ष असतानाही आई-वडिलांना कामात हातभार लावीत कुठलीही तक्रार न करता अभ्यासातही सातत्य राखले. अभ्यासाचे कारण सांगून कधीही कामात टाळाटाळ केली नाही; तसेच अभ्यासाकडेही दुर्लक्ष केले नाही.
आहे त्या परिस्थितीत अभ्यास करून यश मिळवायचेच, हाच ध्यास घेतलेल्या विशाखाला तिच्या शाळेकडूनही मदत मिळाली. शिक्षकांनी तिला वेळोवेळी मार्गदर्शन केले. चिकाटीने अभ्यास करून विशाखाने यंदा दहावीत 96 टक्के गुण मिळविले. परिस्थितीचे भांडवल करणाऱ्या अनेकांसाठी विशाखाचे यश आदर्शवत आहे. तिने इंग्रजी विषयात 98; तर गणितात शंभरपैकी शंभर गुण मिळविले आहेत. तिला विद्यालयातील शिक्षक नारायण खैरे, विकास वाघमारे, प्रमोद डोके, सचिन मोरे यांनी मार्गदर्शन केले. अत्यंत बिकट परिस्थितीत अभ्यास करून यश संपादन करणाऱ्या विशाखाला बिभीषण रोडगे यांनी पुढील शिक्षणासाठी 20 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Web Title: paranda marathwada news vishakha khambayat success in ssc exam