परभणी : ग्रामपंचायतीसाठी आज पारंपरीक पध्दतीनेही अर्ज स्वीकारणार, जातप्रमाणपत्र पडताळणीकरिताही ऑफलाईऩ सुविधा उपलब्ध

गणेश पांडे
Wednesday, 30 December 2020

ग्रामपंचायत निवडणुकीत 23 ते 30 डिसेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी आहे. या कालावधीत संपूर्ण राज्यात संगणक प्रणालीव्दारे तीन लाख 32 हजार 844 इतके उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

परभणी ः ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक अडचणी उद्भवत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी (ता. 30) म्हणजे अंतिम मुदतीत पारंपरिक (ऑफलाईन) पध्दतीने उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे आदेश बजावले आहेत. त्यासाठी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वेळसुध्दा वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीत 23 ते 30 डिसेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी आहे. या कालावधीत संपूर्ण राज्यात संगणक प्रणालीव्दारे तीन लाख 32 हजार 844 इतके उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. परंतु 28 डिसेंबर रोजी सायंकाळपासून काही तांत्रिक अडचणी उद्भवू लागल्याने निवडणूक आयोगाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या.

हेही वाचा - सशस्त्रसेना ध्वजनिधीस या क्युआर कोडद्वारे देता येईल देणगी- जिल्हाधिकारी डॉ. विपीन -

त्या पार्श्वभूमीवरच उमेदवारी अर्जापासून कोणताही इ्च्छुक वंचित राहू नये, त्यास निवडणूक लढविण्याची संधी मिळावी, या हेतूने निवडणूक आयोगाने बुधवारी निर्धारित वेळेत वाढ करीत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यास तसेच पारंपरिक पध्दतीने म्हणजे ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना दिल्या आहेत.

दरम्यान, अर्जदारांची संख्या वाढल्याने व ऑनलाईन प्रणालीचा वेग मंदावल्याने जात प्रमाणपत्राची  व जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव ता. 29 व 30 डिसेंबर या दोन दिवशीच ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने स्वीकारावेत, असेही निवडणूक आयोगोने म्हटले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: Applications for Gram Panchayat will be accepted in traditional way today, offline facility is also available for verification of caste certificate parbhani news