Parbhani Breaking : २१ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा, संख्या सातवर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

आॅरेंजमधून ग्रीन झोनमध्ये गेलेल्या परभणी जिल्हा पुन्हा आॅंरेज झोनमध्ये आला असून, मंगळवारी (ता.१९ मे) सातवा कोरोना पॉझिटिव रुग्ण आढळला आहे.  

परभणी : शहरात मंगळवारी (ता.१९ मे) सकाळी २१ वर्षीय युवकाला कोरोना विषाणूची बाधा झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान, हा युवक पुणे येथून परभणीत रविवारी (ता. १७ मे) आला होता. त्यामुळे आता परभणी जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या ७ वर गेली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग आपल्या जिल्ह्यात पसरू नये म्हणून परभणी जिल्ह्यात सीमा बंदी करण्यात आली होती. परंतु, या सीमा बंदीला धुडकावत शेकडो जण परभणीत दाखल झाले आहेत. आजही होत आहेत.  यात विशेष करून मुंबई व पुणे या मोठ्या शहरातील वास्तव्यास असलेल्या नागरिकांचा समावेश आहे. सोमवारी (ता.१८ मे) सायंकाळी सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे मुंबईहून आलेल्या एका महिलेला कोरोना विषाणुची बाधा झाल्याचे निदर्शनास आले. यापूर्वी जिंतूर तालुक्यातील शेवडी येथे मुंबईहून परतलेल्या तिघांना कोरोणाची बाधा झाली आहे. 

हेही वाचा - चोर पावलांनी सोनपेठमध्ये कोरोनाचा शिरकाव

मंगळवारी (ता.१९ मे) सकाळी परभणी शहरातील साकला प्‍लॉट भागात राहणाऱ्या २१ वर्षीय युवकाला कोरोना विषाणूची बाधा झाली असल्याचा अहवाल नांदेड येथील प्रयोगशाळेने जिल्हा शल्यचिकित्सक परभणी यांना पाठवला. हा युवक रविवारी पुण्यातून त्याच्या स्वतःच्या वाहनाने परभणी येथे आला होता. त्याची प्रकृती खराब झाल्याने त्याने सोमवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतःची तपासणी करून घेतली होती. 

त्यावेळी परभणीतील वैद्यकीय तज्ज्ञांनी त्याचा स्वब घेऊन तो तपासणीसाठी नांदेड येथील प्रयोगशाळेत पाठवला होता. त्याचा अहवाल मंगळवारी (ता.१९) पहाटे जिल्हा रुग्णालयात प्राप्त झाला. त्या अहवालात हा युवक कोरोना विषाणू संक्रमित असल्याचे आढळले. हा युवक पुणे शहरातील फातेमानगर येथे वास्तव्यास होता. तो पुण्याहून येताना त्याच्या सोबत कोण होते? तो परभणीत कोणाकोणाच्या संपर्कात आला? याची माहिती वैद्यकीय अधिकारी व पोलिस अधिकारी घेत आहेत.

हे देखील वाचलेच पाहिजे - जिल्हा परिषद बदल्यांच्या घोडेबाजाराला यंदा कोरोनाचा ब्रेक

साखला प्‍लॉट प्रतिबंधित क्षेत्र जाहीर
परभणी शहरातील साकला प्‍लॉट भागात २१ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मंगळवारी (ता.१९ मे) पहाटे साकला प्‍लॉट भागासह त्या लगतचा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. या भागाचे प्रमुख रस्ते बंद करण्याचे काम पोलिसांच्या वतीने सकाळी करण्यात आले. महपालिकेचे एक पथक या भागात दाखल झाले असून संशयित रुग्णांची तपासणी केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani Breaking: 21 Year Old Corona Obstruction