चोर पावलांनी सोनपेठमध्ये कोरोनाचा शिरकाव

कृष्णा पिंगळे
Monday, 18 May 2020

शेळगाव (ता.सोनपेठ, जि.परभणी) येथील महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्याने  जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शेळगाव कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे.

सोनपेठ (जि.परभणी) : सोनपेठ तालुक्यात अनधिकृतरीत्या प्रवेश केलेल्या नागरिकांतील एक महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आल्याने प्रशासनाने शेळगाव हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
जोगेश्वरी मुंबई येथून आलेले एक कुटुंब अनधिकृतरीत्या गावात आल्याची माहिती प्रशासनाला मिळताच प्रशासन व पोलिसांनी ता. १५ रोजी सदरील कुटुंब व मुंबईवरून आलेले इतर सहा नागरिक यांना सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले. तपासणीनंतर यातील एका कुटुंबातील आई-वडील व मुलगी हे संशयास्पद आढळून आल्याने त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. तसेच त्यांचे स्वॅब नमुने घेऊन चाचणीसाठी पाठवण्यात आले. उर्वरित सहा जणांना निवाराग्रहात पाठवण्यात आले होते. ता.१८ रोजी चाचणीसाठी गेलेल्या अहवालांपैकी पंचेचाळीसवर्षीय महिलेचा अहवाल कोरोनाबाधित आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शेळगाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. ता. १८ रोजीच्या संध्याकाळी सहापासून पुढील आदेशापर्यंत शेळगावमधील नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात सापडलेले कोरोनाबाधित रुग्ण हे बाहेर जिल्ह्यांतून आलेल्या व्यक्तीच असल्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांबाबत जनतेत मोठे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा : शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी बांधावर जा : कृषिमंत्री दादा भुसे

सोनपेठ तालुका प्रशासन सज्ज
सोनपेठ तालुक्यात कोरोनाबाधित महिला रुग्ण असल्याचा अहवाल आल्यानंतर सोनपेठ तालुका प्रशासनाने कोरोनाशी लढण्याबाबत आपली कंबर कसली आहे. त्यासाठी तातडीने बैठक घेऊन शेळगाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यामध्ये तहसीलदार, पोलिस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. संबंधित कुटुंबासह प्रवास करत आलेल्या सहा नागरिकांना निवारागृहातून तत्काळ ग्रामीण रुग्णालयातील विलगीकरण कक्षात आणण्यात आले आहे.

हेही वाचा व पहा : Video : कृषी पर्यटनाला कोरोनाची झळ; उद्योग बंदने बिघडला उत्पनाचा ताळेबंद

 
 ६६ जणांचे स्वॅब अहवाल प्रलंबित
परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणुची बाधा झालेल्या रुग्णाची संख्या ६ वर गेली आहे. जिल्ह्यात संशयीत रुग्णांची संख्या आता एक हजार ४०२ वर गेली आहे. त्यापैकी एक हजार ३०८ रुग्णांचे स्वॅब अहवाल निगेटीव्ह आले आहेत. परंतू ६६ जणांच्या स्वॅबचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.
परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्ग झालेले सहा रुग्ण आहेत. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. ६ पैकी चार रुग्ण हे परभणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात तर सोमवारी (ता.१८) शेळगाव येथे सापडलेल्या महिलेवर सोनपेठ येथे उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात एकूण संशयीत एक हजार ४०२ रुग्ण आहेत. त्यापैकी एक हजार ३०८ रुग्ण निगेटीव्ह निघाले आहेत. ६६ रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. एक रुग्ण यापूर्वीच कोरोनामुक्त झालेला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women corona positive in Sonpeth taluka Parbhani News