esakal | परभणी : शिक्षण क्षेत्राला ऊर्जा देणार्‍या डॉ. सुचिता पाटेकर, आधूनिक सावित्रीची लेक
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मला शिक्षकांचा अभिमान आहे. ही भूमिका घेऊन शिक्षकांच्या खांद्याला खांदा लावून परभणी जिल्ह्यातील खेड्या- पाड्यातील गोर गरिबांच्या मुलांसाठी धडपडणार्‍या आधुनिक 'सावित्रीची लेक' म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ.सुचिता पाटेकर ओळखल्या जात आहेत.

परभणी : शिक्षण क्षेत्राला ऊर्जा देणार्‍या डॉ. सुचिता पाटेकर, आधूनिक सावित्रीची लेक

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : जिल्हा परिषद शाळांमध्ये काम करणारा शिक्षक कोणत्याही क्षेत्रात मागे राहत नाही. नव्या पिढींच्या जाणिवा विकसित करता करता स्वतःच्या जाणिवा समृद्ध करण्याची प्रक्रिया सुरु ठेवणारा शिक्षक आहे. मला शिक्षकांचा अभिमान आहे. ही भूमिका घेऊन शिक्षकांच्या खांद्याला खांदा लावून परभणी जिल्ह्यातील खेड्या- पाड्यातील गोर गरिबांच्या मुलांसाठी धडपडणार्‍या आधुनिक 'सावित्रीची लेक' म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ. सुचिता पाटेकर ओळखल्या जात आहेत.
 
शेतकरी कुटुंबात लहानाच्या मोठ्या झालेल्या व शिक्षणानेच माणूस मोठा होतो. याचे बाळकडू लहानपणीच आईने दिल्याने. सुरुवातीपासूनच शिक्षणात एक वेगळी गोडी डाॅ.सुचिता पाटेकर यांच्या मनात निर्माण झाली. अमरावतीमधील आदिवासी भागात सहाय्यक शिक्षिका म्हणून त्या काम करु लागल्या. शिक्षणातील अनेक समस्या त्यांच्या नजरेसमोर उभ्या राहू लागल्या. हे सर्व बदलायचं असेल तर आपल्या हातात अधिकार असायला हवेत असं त्यांना वाटू लागलं. शिक्षण क्षेत्रास एका उंचीवर नेण्याचा मानस ठेवून त्या स्पर्धा परिक्षेची तयारी करु लागल्या. पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये उतिर्ण झाल्या. त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्विकारला. 

हेही वाचानांदेडला हायटेक शेती : पाचशे एकरावर होतोय कोथिंबीर उत्पादनाचा प्रयोग -

नविन पदाची जबाबदारी घेताच यवतमाळ जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. यामध्ये बालनाट्य महोत्सव, वाचनसंस्कृती टिकविण्यासाठी शाळांमध्ये ग्रंथप्रदर्शन, पुस्तक- भिशीच्या माध्यमातून ग्रंथालयात मोठ्या प्रमाणात पुस्तके उपलब्ध करून देणे, तंबाखू मुक्त जिवन शपथ कार्यक्रमात पालक विद्यार्थी व शिक्षक यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवल्याने त्यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात सहा वर्षे काम केल्यानंतर मे- २०१९ मध्ये हे उपक्रमशील व्यक्तिमत्व परभणी जिल्ह्यास लाभलं. 

परभणीत आल्यानंतर गुणवंत शाळेच्या शंभर विद्यार्थ्यांना हैदराबादची हवाई सफर घडवून आणत त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. खेड्यापाड्यातील मुलांसाठी हा अनुभव अविस्मरणीयचं! लॉकडॉनमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन चाचण्यासारखा उपक्रम राबवण्यात आला. तसेच शिक्षकांमधील कवींसाठी वेगळा प्रयोग म्हणून ऑनलाईन कवी संमेलन घेण्यात आले. यात शंभर शिक्षकांनी सहभाग नोंदवला. या सर्व कवितांचं सुंदर अक्षरलेणं पुस्तक रुपानं निर्माण होत आहे. मुलांमधील काव्यप्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी मुलांचे बाल काव्यसंमेलन घेण्यात आले.तसेच कलेतून उपजिविका करण्याचे धडे विद्यार्थ्यांना मिळावेत यासाठी ऑनलाइन रांगोळी, चित्रकला फुग्यांचे डेकोरेशन आदी उपक्रम घेण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित करण्याची संधी मुलांना मिळाली. 

ग्रामीण भागात सर्व पालकांकडे स्मार्ट मोबाइल नसतात ही गोष्ट लक्षात घेऊन गावांमध्ये अभ्यास गटांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास काही हरकत नाही. असा शिक्षकांचा विश्वास घेऊन गटामध्ये अभ्यास गटाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात करण्यात आली. यासाठी गावातील उच्चशिक्षित मुलांना 'शिक्षकमित्र' बनवण्यात आले. मंदिरावरील  लाऊडस्पीकरवरुन कविता, इंग्लिश लर्निंगसारखे उपक्रम गावागावात भोंगाशाळा या नावाने राबवण्यात येत आहेत. त्यामुळे शाळा बंद असल्या तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी मात्र शिक्षणाचे धडे गिरवत असल्याच दिसू लागलं. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी एकपात्री अभिनय स्पर्धा घेण्यात आली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्यातील कला गुण दाखवण्याची संधी मिळाली. नवोपक्रम शिक्षकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये बाराशे शिक्षकांनी सहभाग नोंदवला.

येथे क्लिक करापरभणीच्या शहर वाहतुक शाखेची उत्कृष्ट कामगिरी, वर्षभरात 54 लाख 51 हजार 950 रुपयांचा दंड वसुल

विशेष म्हणजे या कालावधीतही ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत मागे राहू नये यासाठी ऑनलाईन नवोदय व स्कॉलरशिप चे वर्गही सुरु आहेत. याशिवाय ऑनलाईन माध्यमातून पाठ घेऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात येत आहे. बालदिनाचे औचित्य साधून पुस्तक परीक्षण सारखा उपक्रमही घेण्यात आला. या सर्व कामात स्वतः ला झोकून देऊन काम करणार्‍या ५२५ गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन मनोबल वाढवण्यात आलं. मुख्य म्हणजे थँलेशियाग्रस्त बालकांसाठी रक्तदान शिबिराचाही उपक्रम राबवण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कारासह अन्य विविध पुरस्काराने सन्मानित हे उपक्रमशील व्यक्तिमत्व परभणी जिल्ह्यासाठी मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. या कार्यामुळे डॉ. सुचिता पाटेकर यांना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांसह नागरिक आधुनिक 'सावित्रीची लेक' म्हणून ओळखू लागले आहेत.

अनेकदा शिक्षणाधिकारी कायदा, कर्तव्य, नियम ,पुस्तके, जीआर यामध्ये इतके गुंतून जातात की त्यातून सुहृदयता हद्दपार होते. विविध प्रयोग करण्याची ऊर्जा अधिकार बजावण्यात वाया जाते. एखाद्या विशाल समुद्राला किनार्‍यावरच बांध घालावा त्याप्रमाणे पदाला संकुचित करणारे अधिकारी नव्या पिढीचे भविष्य संपवून टाकतात. याला आमच्या शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर अपवाद आहेत.
- युवराज माने, शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पार्डी, ता.सेलू

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image