esakal | परभणी : कुनब्याचा पोर लढायला शिकला, शेतमजूराच्या मुलाने घेतली संशोधन क्षेत्रात उत्तुंग भरारी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

विठ्ठलराव भोसले या स्वतः च्या मालकीची जेमतेम शेती असलेल्या व बारमाही शेतमजुरी करणार्‍या शेतमजुराचा मुलगा. आई- वडील मोलमजुरी करायचे. शिक्षण घेत घेत मुंजाजी घरसंसार चालावा म्हणून वेळप्रसंगी स्वतः ही मजूरी करत.

परभणी : कुनब्याचा पोर लढायला शिकला, शेतमजूराच्या मुलाने घेतली संशोधन क्षेत्रात उत्तुंग भरारी

sakal_logo
By
जगदीश जोगदंड

पूर्णा (जिल्हा परभणी) : तालुक्यातील खांबेगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा सुट्टीत काळ्यामातीत राबणारा मुंजाजी भोसले यांना मातीचा लळा लागला अन त्यातच संशोधन करत त्याने भूगर्भशास्त्र विषयात संशोधन करत डॉक्टरेट मिळविली.

विठ्ठलराव भोसले या स्वतः च्या मालकीची जेमतेम शेती असलेल्या व बारमाही शेतमजुरी करणार्‍या शेतमजुराचा मुलगा. आई- वडील मोलमजुरी करायचे. शिक्षण घेत घेत मुंजाजी घरसंसार चालावा म्हणून वेळप्रसंगी स्वतः ही मजूरी करत. पण शिक्षण घेण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या मुंजाजीने खांबेगाव येथील प्राथमिक शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर प्राथमिक शाळेतील अशोक जाधव या शिक्षकाची मदत घेत परभणी येथील आश्रमशाळेत प्रवेश मिळवला. इथेही आपल्या होतकरु आणि मेहनती वृत्तीने सर्व शिक्षकांची मर्जी संपादन करुन शिकत राहिला. दहावी बारावी परिक्षेतील जेमतेम यशानंतरही खचून न जाता त्याने विज्ञान शाखेत प्रवेश मिळवून तो परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालय येथून बी. एससी. पदवी मिळवत एक एक पायरी चढतच राहिला. 

हेही वाचा -  हिंगोली : शेवाळा गावात बिबट्या दिसला, ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण.

सोबतचे मित्र आणि शिक्षक यांनी मुंजाजीला कुठलीही अडचण येऊ दिली नाही. बी. एससीनंतर मात्र नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्रवेश घेताना डॉ. के. विजयकुमार यांना त्याने आपली कैफियत सांगत सगळी परिस्थिती उलगडून दाखवली. प्रोफेसर डॉ.के. विजयकुमार यांनी या विद्यार्थ्यामधली तळमळ व जिद्द लक्षात घेऊन त्याला भक्कम आधार देत पाठराखण केली. दरम्यानच्या काळात खांबेगाव येथील शिक्षक डॉ. दिलीप शृंगारपुतळे यांनीही आवश्यक ती मदत करत मुंजाजीचे मनोबल उंचावण्यासाठी भक्कम पाठिंबा दिला. मुंजाजीने भूगर्भशास्त्र विषयाची आपली वेगळी वाट निवडत प्रोफेसर डॉ. के. विजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली याच विषयात एम. एससीमध्ये विद्यापीठातून सुवर्णपदक मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. या सर्व कालावधीत मुंजाजी एकीकडे कोचिंग क्लासेसवर शिकवत आपला शिक्षणाचा खर्च भागवत असे. 

काही दिवस नांदेडमध्ये मराठा सेवा संघाच्या वतीने चालवत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांसाठीच्या वसतिगृहाचा आधारही त्याने घेतला. एम. एससीच्या परिक्षेत विद्यापीठातून सर्वप्रथम येत सुवर्णपदक मिळवल्याने पी. एचडीसाठीची फेलोशिप मुंजाजीला मिळाली. मात्र तरीही वेगवेगळ्या क्लासेसमध्ये शिकवणी घेत घेत मुंजाजीने फेलोशिपच्या पैशातून दोन बहिणींची लग्ने केले. आयुष्यभर सालगडी म्हणून मजुरी करत असलेल्या वडिलांना घरच्या चार एकर शेतीत विहीर पाईपलाईन करुन देत सन्मानाचा रोजगार उपलब्ध करुन दिला. हे सर्व करत करत त्याने प्रोफेसर के. विजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आपला शोध प्रबंध स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे सादर केला. 

येथे क्लिक करापरभणी शहरात नवे आठ जलकुंभ कार्यान्वीत

रेमंड दोरायस्वामी यांच्या बहिस्थ परिक्षण व अंतिम मुलाखतीनंतर त्यांना मंगळवारी (ता. २९ )  मुंजाजी भोसले यांना भूगर्भशास्त्र विषयातील पीएचडी ही पदवी विद्यापीठाने प्रदान केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दारिद्र्याशी दोन हात करत मुंजाजीने अभावग्रस्त जगण्याशी शर्थीने झुंज देत जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या बळावर हे यश संपादन करुन संघर्ष करणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना एक प्रेरणादायी संदेश दिला आहे. मुंजाजीच्या या यशाबद्दल प्रा. इंद्रजीत भालेराव, मराठा वसतिगृहाचे मधुकरराव देशमुख, डॉ. दिलीप शृंगारपुतळे, प्रा. रवी मुळे, प्रा.बाबर, प्रा.गजानन जाधव, प्रा. संतोष देवराया प्रा. भगवान काळे, केशव खटिंग, डॉ.दीपक पानसकर,  डॉ. केशव देशमुख, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, गोविंद दळवी,  बी. आर. डोंगरे यांनी अभिनंदन केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे