कमी भाव म्हणजे शेतकऱ्यांचे रडगाणे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 जानेवारी 2019

परभणी - सहकार राज्यमंत्री तथा परभणीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रास्त भाव मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी वक्‍तव्‍य केले. राज्यात शेतमालास भाव नाही, असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांना श्री. पाटील यांनी ‘शेतकऱ्यांचे नेहमीचेच रडगाणे’ असल्याचे म्हटले. विशेषतः सेंद्रिय भाजीपाला बाजाराच्या उद्‌घाटनाच्या भाषणात त्यांनी हे विधान केल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. 

परभणीतील शनिवार बाजार येथील मैदानात ‘संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजारा’चे रविवारी (ता. १३) उद्‌घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी., आयुक्त रमेश पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, बाजार समितीचे उपसभापती सोपानराव अवचार, सखूबाई लटपटे आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘शेतमालास भाव नाही, हे शेतकऱ्यांचे नेहमीचे रडगाणे आहे. 

या रडगाण्यावर उपाययोजना म्हणून राज्य शासनाने २०१६ मध्ये नवीन आठवडे बाजाराची संकल्पना आणली.’ बाजाराच्या पहिल्याच दिवशी पालकमंत्र्यांनी असे विधान केल्याने शेतकरी नाराज झाले. येथील बाजारात येणारा सेंद्रिय भाजीपाला बिघडणाऱ्या आरोग्यावर एकमेव पर्याय असल्याचेही श्री. पाटील म्हणाले. प्रास्ताविकात पणन विभागाचे उपसरव्यवस्थापक गजानन वाघ यांनी शेतमाल प्रत्यक्ष आणि थेट ग्राहकांना विकण्यासाठी वर्णेश्वर ग्रो प्रोड्युसर कंपनी (वर्णा, ता. जिंतूर) या संस्थेला नोडल एजन्सी म्हणून नेमण्यात आल्याचे सांगितले. 

बाजारासाठी आणखी तीन जागा 
कार्यक्रमात महापौर मीनाताई वरपुडकर यांनी या बाजारासाठी महापालिकेकडून आणखी तीन जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. परंतु बाजारात ग्राहकांनी भाव करू नये; कारण रसायनमुक्त भाजीपाला खाल्ल्याने नागरिक रोगमुक्त राहून दवाखान्याचे पैसे वाचतील, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Parbhani Guardian Minister Gulabrao Patil made statements about farmers demanding fair prices