परभणी : किसान संघर्ष जत्था दिल्लीला धडकणार- राजन क्षीरसागर यांची माहिती

गणेश पांडे
Wednesday, 30 December 2020

ता. 2 जानेवारी रोजी गंगाखेड येथून प्रस्तान, राजन क्षीरसागर यांची माहिती

परभणी ः तीन शेतकरी कायद्या विरोधातील आंदोलनाबाबत व्हर्च्युअल सभेद्वारे व्यक्त केलेल्या जळफळाट व खोटारड्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांचा निर्धार व संयम तसूभरही विचलित होणार नाही. उलट दिल्ली येथील शेतकरी आंदोलनातील सहभाग वाढता आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मराठवाड्यातील आंदोलकांचा किसान संघर्ष जत्था गंगाखेड (जि. परभणी) येथून ता. 2 जानेवारी रोजी वाहनांच्या ताफ्यासह रवाना होत आहे अशी माहिती कामगार नेते राजन क्षीरसागर यांनी दिली.

नागपूर येथे अन्य विदर्भ खानदेश या अन्य विभागातून आलेल्या जत्थ्याचे एकत्रीकरण करून ता. 3 जानेवारी रोजी नागपूर येथून इंदोर मार्गे दिल्लीकडे रवाना होत आहे. या किसान संघर्ष जत्थ्यात मराठवाडा व विदर्भातील अनेक शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील प्रतिनिधी देखील सहभागी होत आहेत. महात्मा फुले यांचा शेतकऱ्यांचा आसूड दिल्लीमध्ये कडाडल्या शिवाय राहणार नाही असे ही श्री. क्षीरसागर म्हणाले. ग्रामीण युवकांनी यात मोठ्या प्रमाणावर सहभाग देण्याचे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचापरभणी : ग्रामपंचायतीसाठी आज पारंपरीक पध्दतीनेही अर्ज स्वीकारणार, जातप्रमाणपत्र पडताळणीकरिताही ऑफलाईऩ सुविधा उपलब्ध

कार्पोरेट मित्रांना मुनाफेखोरी करण्यासाठी आणि जागतिक व्यापार संघटनेला दिलेला शब्द पाळण्यासाठी देशातील भूमिपुत्रांशी द्रोह करण्याचे काम नरेंद मोदी सरकार या शेतकरी विरोधी कायद्याद्वारे करीत आहे असा आरोप राजन क्षीरसागर यांनी केला आहे. महारष्ट्रातील संयुक्त किसान मोर्चात सहभागी झालेल्या अनेक संघटना यामध्ये सहभागी आहेत भाकप प्रणीत किसान सभा, सत्यशोधक किसान सभा, शेतकरी संघर्ष समिती, शेतकरी कष्टकरी संघर्ष समिती, मानव मुक्ती मिशन, जात्यंतक शेतकरी सभा, संभाजी ब्रिगेड या सह अनेक संघटना शेकडो वाहनांचा ताफ्यात सुमारे 25 जिल्ह्यातील पाच हजार शेतकरी सहभागी होत आहेत असेही राजन क्षीरसागर यांनी सांगितले.

ता. दोन जानेवारी रोजी या मराठवाडा किसान संघर्ष जत्थ्यास रवाना करताना गंगाखेड येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेस कॉम्रेड नामदेव गावडे संबोधित करणार आहेत. मराठवाड्यातून या किसान संघर्ष जत्थाचे नेतृत्व कामगार नेते राजन क्षीरसागर, माणिक कदम, कैलास येसगे, शिवाजी कदम, नितीन सावंत आदी नेते करीत आहेत.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: Kisan Sangharsh Jatha will hit Delhi Rajan Kshirsagar's information parbhani news