
गो संवर्धनाची जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यास परवानगी
परभणी ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेकरिता परभणी शहरासह ब्रम्हपुरी (ता. परभणी) येथील कृषी गो संवर्धनांची जागा वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागास हस्तांतरित करण्यास मंजुर उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे मेडीकल कॉलेजच्या मंजुरीतील मोठी अडचण दुर झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय स्थापनेकरिता परभणी शहरातील 14 हेक्टर 88 आर व ब्रम्हपुरी (ता.परभणी) येथील 52 हेक्टर 06 आर जमीन हस्तांतरीत करण्याबाबत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालकांनी जिल्हा प्रशासनास एका पत्राव्दारे सुचवले होते. त्या प्रमाणे ती जमीन ही सातबारा अधिकार अभिलेखात परभणी कृषी गो संवर्धन मर्यादीत परभणी या संस्थेच्या नावे आहे. ही संस्था मराठवाडा विकास महामंडळ औरंगाबाद यांची दुय्यम कंपनी आहे, असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी उद्योग विभागास एका पत्राव्दारे कळवुन ती जमीन हस्तांतराची कारवाई तातडीने करता येईल, असे नमुद केले होते.
हेही वाचा - नांदेड : ग्राम पंचायत निवडणूक, विविध प्रमाणपत्रांसह कर भरण्यासाठी इच्छूकांची धावपळ -
परभणी कृषी गो संवर्धन संस्थेकडे परभणी जिल्ह्यातील परभणी शहर, ब्रम्हपुरी तर्फे लोहगाव, रायपूर, ब्राम्हणगाव, टाकळी कुंभकर्ण, धर्मापुरी, आर्वी व भोगाव येथील सुमारे 400 एकर जमीन आहे. मागणी केलेल्या जमिनी या परभणी शहरापासून जवळ आहेत, असे जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी सांगितले होते. वैद्यकीय महाविद्यालयासाठी त्या जमिनी योग्य व आवश्यक आहेत असे ही सांगितले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानंतर या पार्श्वभूमीवर माजी आमदार अॅड. विजयराव गव्हाणे यांनी गेल्या चार दिवसांपासून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे या प्रस्तावाच्या अनुषंगाने पाठपुरावा सुरू केला होता. त्यास मंत्री देसाई यांनी तात्काळ हिरवा कंदील देऊन ती जमीन वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागास हस्तांतरित करावयास मंजुरी दिली आहे.
लढ्यातील सर्वात मोठे यश
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या लढातील परभणीकरांना हे सर्वात मोठे यश आले आहे. सरकारने जागा हस्तांतरणाची परवानगी दिल्याने लवकरच पुढील कार्यवाही होऊन महाविद्यालयास परवानगी मिळेल ही आशा आहे.
- अॅड. विजयराव गव्हाणे, निमंत्रक, परभणीकर संघर्ष समिती.
संपादन - प्रल्हाद कांबळे