
वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरी संदर्भात माहिती देतांना माजी आमदार अॅड. विजयराव गव्हाणे, सोबत तहसिन अहेमद खान, सुभाषराव जावळे, रामेश्वर शिंदे व इतर
परभणी ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे या कामाला जनशक्तीचा रेटा मिळाल्यास अवघ्या महिण्याभरात आपले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न साकार होऊ शकते. यासाठी परभणी संघर्षाची भूमी पुन्हा एकदा पेटविण्याची गरज आहे असे मत परभणीकर संघर्ष समितीचे निमंत्रक माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे यांनी शनिवारी व्यक्त केले.
परभणी शहरात वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी परभणीकर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख याची भेट घेतली. या तिन्ही नेत्यांचे या प्रश्नावर लक्ष केंद्रीत करून त्यांची सकारात्मकता मिळविली आहे. या संदर्भात शनिवारी (ता.12) परभणीकर संघर्ष समितीच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेस माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे, तहसिन अहेमद खान, सुभाषराव जावळे, रामेश्वर शिंदे, अॅड, पवन निकम, अजय गव्हाणे यांची उपस्थित होती.
हेही वाचा - परभणी : परळीतून दोन सोनसाखळी चोरांना अटक, तर नगरसेविकेच्या पतीकडून महापालिकेच्या अभियंत्यास मारहाण
श्री. गव्हाणे पुढे म्हणाले, संघर्ष समितीने नुकतीच खासदार शरद पवार यांची भेट घेतली. त्यांना परभणीतील वैद्यकीय महाविद्यालयाची आवश्यकता अधोरेखित केली. शिवाय, वैधानिक विकास महामंडळाने ठराव करून परभणीला वैद्यकीय महाविद्यालय देण्यासाठी शिफारस केली आहे. सोबतच राज्यात दुसऱ्या क्रमांकाची ओपीडी ही परभणी जिल्ह्यात आहे. यासह अनेक आवश्यक बाबी समितीने श्री. पवार यांच्यासमोर मांडल्या. त्यावर श्री. पवार परभणीतील वैद्यकीय महाविद्यालयासाठी आग्रही असल्याचे श्री. गव्हाणे यांनी पत्रकारांना सांगितले. त्याही पुढे जाऊन त्यांनी वैद्यकीय मंत्री अमित देशमुख यांना फोन करून संघर्ष समितीला या कामासाठी वेळ देण्याची सांगितले. म्हणून मंत्री देशमुख यांनी तातडीने बैठक घेऊन वैद्यकीय महाविद्यालयाचा शब्दही दिला. तत्पूर्वी खासदार शरद पवार यांनी वैद्यकीय महाविद्यालयासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगेल, असेही सांगितल्याचे श्री गव्हाणे म्हणाले. म्हणून जवळपास महाविद्यालयाचे काम झाले आहे.
ब्रम्हपुरी येथील जागा होणार हस्तांतरीत
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाचे संचालकांनी जिल्हाधिकारी परभणी यांना ता.11 डिसेंबर रोजी जमीन हस्तांतरनाचे पत्र दिले आहे. या पत्रात ब्रम्हपुरी (ता.परभणी) येथील 11.88 हेक्टर जागा वैद्यकीय महाविद्यालयाकरिता वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्याची शिफारस सहस्त्रबुध्दे समितीने केली होती. त्यानुसार ही जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करावी असे या पत्रात नमुद केले आहे. हे पत्र शनिवारी अॅड. विजयराव गव्हाणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. येत्या दोन दिवसात यावर कारवाई होऊन पत्र परत जाणार आहे असेही श्री.गव्हाणे यांनी सांगितले.
संपादन- प्रल्हाद कांबळे