
त्रिमूर्तीनगरमधील सुधाकर जोशी यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी दोघा चोरट्यांनी ता. चार डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास लांबवली होती. गळ्यातील सोन्याची साखळी चोरणारे हे इराणी वस्तीवरील व परळी पोलिस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्यांना मिळाली होती.
परभणी ः गळ्यातील सोन्याची साखळी हातोहात लांबवणार्या दोन अट्टल चोरांना परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता.11) सांयकाळी परळीतून अटक केली. या चोरट्यावर राज्यातील विविध जिल्ह्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
त्रिमूर्तीनगरमधील सुधाकर जोशी यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी दोघा चोरट्यांनी ता. चार डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास लांबवली होती. गळ्यातील सोन्याची साखळी चोरणारे हे इराणी वस्तीवरील व परळी पोलिस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्यांना मिळाली होती. विशेष म्हणजे सध्या ते परळीत असल्याची माहिती मिळाली होती. ही बाब स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांना सांगितली. श्री. मीना यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विश्वास खोले, फौजदार साईनाथ पुयड यांच्यासह कर्मचारी हनुमंत जक्केवाड, मधुकर चट्टे, बाळासाहेब तुपसुंदरे, दिलावर खान, सय्यद मोबीन, किशोर चव्हाण, हरिचंद्र खुपसे, भगवान भुसारे, संजय घुगे यांनी परळी येथे या आरोपीस ताब्यात घेण्यासाठी पाठवले.
परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परळी पोलिसांशी संपर्क साधला. तेथील पोलिस निरीक्षक पी. एन. पवार, कर्मचारी सचिन सानप, व्यंकट भताने, दत्ता गिते यांच्या मदतीने परळीत सतत चार दिवस या पथकाने संयुक्त सापळा लावला. परंतु आरोपीस पोलिसांची चुणूक लागल्याने आरोपी पोलिसांना गुंगारा देत लपून राहू लागले होते. मात्र, येथील पथकाने परळीत ठाण मांडून आरोपीच्या मागावर राहीले. अखेर स्थानिक गुन्हे शाखेस हवे असलेले दोघेही सापडले. इरफान खान शरीफ खान (रा.इराणीवस्ती, परळी वैजनाथ) व रेहना लाल खान पठाण (रा. आयशा कॉलनी, परळी) या दोघांना ताब्यात घेण्यात यश आले. या दोघांची पथकाने चौकशी केली असता त्यांनी परभणीतील त्रिमूर्तीनगरातून गळ्यातील सोन्याची साखळी लांबवल्याचा गुन्हा केला. दोन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने नानलपेठ पोलिसांच्या स्वाधीन केले.
नगरसेविकेच्या पतीकडून महापालिकेच्या अभियंत्यास मारहाण
परभणीः महापालिकेच्या कार्यालयात येवून शहर अभियंत्याशी विनाकारण वाद घालत त्यांना एका नगरसेविकेच्या पतीने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता.11) दुपारी घडली. या प्रकरणी
महापालिकेतील प्रभारी शहर अभियंता पठाण वसिम खान यांनी नवामोंढा पोलिस ठाण्यात नगरसेविका फातेमा अब्दूल जावेद यांचे पती अब्दूल जावेद अब्दूल रशीद यांनी थापडबुक्यांनी मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. अभियंता वसिमखान पठाण यांनी नवामोंढा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवारी दुपारी आपण कार्यालयात कार्यालयीन कामकाज करीत असताना प्रभाग क्रमांक अकराच्या नगरसेविका फातेमा अब्दूल जावेद यांचे पती अब्दूल जावेद अब्दूल रशीद हे कार्यालयात आले. त्यांनी योजनेची माहिती व कागदपत्रे पहावयाची असल्याचे म्हटले. आपण तेथे असलेल्या कर्मचार्यांना माहिती दाखवण्याबाबत सांगितले. त्याचवेळी अब्दूल जावेद यांनी माझ्याशी मोठ्याने का बोलता, असे म्हणत शिविगाळ करण्यास सुरवात केली. आपण त्यांना अरेरावी का करता, शिव्या का देतात, असे म्हटले असता त्यांनी आपल्या कॉलरला धरून आपणास धक्काबुक्की करून मारहाण केल्याचे म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास फौजदार सुनील पल्लेवाड हे करीत आहेत.
संपादन- प्रल्हाद कांबळे