परभणी-मिरखेलच्या डबलिंग लाईनवर मार्चमध्ये धावणार रेल्वे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

औरंगाबाद - नांदेड विभागात रेल्वे दुहेरीकरणाचे (डबलिंग) काम सुरू आहे. यात परभणी ते मिरखेलपर्यंतचे काम अंतिम टप्प्यात असून, हे काम मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक (जीएम) विनोद कुमार यादव यांनी शनिवारी (ता.28) दिली.

औरंगाबाद - नांदेड विभागात रेल्वे दुहेरीकरणाचे (डबलिंग) काम सुरू आहे. यात परभणी ते मिरखेलपर्यंतचे काम अंतिम टप्प्यात असून, हे काम मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक (जीएम) विनोद कुमार यादव यांनी शनिवारी (ता.28) दिली.

महाप्रबंधकाचा पदभार स्वीकारल्यानंतर विनोद कुमार यादव पहिल्यांदाच नांदेड विभागाच्या वार्षिक निरीक्षणासाठी औरंगाबादेत आले होते. या दौऱ्यात त्यांनी शुक्रवारी (ता.27) अकोला ते पूर्णा दरम्यान पाहणी केली. त्यानंतर शनिवारी ते नगरसोलपर्यंत गेले. शिर्डी, शनिशिंगणापूरचे दर्शन करून दुपारी बारा वाजता रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेले हॉलिडे होमचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रेल्वे स्थानकाला भेट देत पत्रकारांशी संवाद साधला. श्री. विनोद यादव म्हणाले, पंधरा दिवसांपूर्वीच पदभार हाती घेतला आहे. त्यात नांदेड विभाग खूप महत्त्वाचा वाटला. नांदेड विभागीय प्रवाशांच्या अनेक मागण्या आहेत. त्या प्रलंबित आहेत. यामध्ये कोच वाढविणे, गाड्या वाढविणे, नवीन गाड्या सुरू करणे अशा मागण्यांचा समावेश आहे. अभ्यास करून या मागण्या सोडविणार आहे. पहिला भर सुरक्षेवर आहे. प्रत्येक गाडी, मालगाडी सुरक्षित चालावी, तसेच प्रवाशांचे समाधान याकडे लक्ष आहे. या वेळी नांदेडचे डीआरएम ए. के. सिन्हा यांची प्रमुख उपस्थिती होती. या भेटीत मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा, नोम हायवे रेल यात्री ऑर्गनायझेशनचे गौतम नाहाटा, राजकुमार सोमाणी, स्टेशन मास्तर अशोक निकम उपस्थित होते.

मुकुंदवाडी, नगरसोलला देणार सुविधा
मुकुंदवाडी रेल्वे स्थानकाला सुविधा देण्याचे कामे सुरू आहे. त्यात अजून वाढ करण्यात येईल, असे सांगत साईभक्‍त असलेल्या महाप्रबंधकांनी साई भक्‍तांसाठी नगरसोल रेल्वे स्थानकावर विविध सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. यात वेटिंग रूम, एक्‍सलेटर बसविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. एक विभाग दुसऱ्या विभागात जोडण्याची प्रक्रिया मोठी आहे. यामुळे नांदेड विभागाचा मध्ये रेल्वेत समावेश होऊ शकत नसल्याचे संकेतही या वेळी त्यांनी दिले. औरंगाबाद रेल्वेस्थानकावर चांगली स्वच्छता ठेवणारे स्वच्छता इन्स्पेक्‍टर अशुतोष गुप्ता यांना दोन हजार रुपये, तर हॉलिडे होमचे आकर्षक काम करणाऱ्या अधिकाऱ्याला दहा हजार रुपयांचे बक्षीस या वेळी महाप्रबंधकांनी जाहीर केले.

Web Title: parbhani-mirkhel doubling line railway