परभणी : ग्रामपंचायत निवडणुकीत नवखे फार्मात; जुने कोमात, उमेदवारांच्या गावा- गावात विजयी मिरवणुका

file photo
file photo

परभणी ः जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी (ता.18) हाती आले. या निवडणुकीत काही ठिकाणी अपेक्षे प्रमाणे तर काही ठिकाणी अपेक्षा भंग करणारे निकाल लागले. काही गावात नवख्या नेत्यांच्या हातात सत्ता गेली तर काही ठिकाणी जुन्याच्या अनुभवावर लोकांनी विश्वास दाखवत परत त्यांच्याच हाती सत्ता दिली आहे. जिल्ह्यातील नवख्या नेत्यांच्या पदरात मतदारांनी मतांचे दान टाकल्याने ते मात्र फार्मात आले तर काही कोमात गेल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.

परभणी जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतीसाठी ता. 15 जानेवारी रोजी मतदान झाले. या निवडणुकीत 2 हजार 39 प्रभागातील एकूण 4 हजार 300 जागांसाठी 12 हजार 733 उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. खऱ्या अर्थाने ता. 30 पासून उमेदवारांच्या प्रचाराचा धुरळा दिसून आला. गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास पॅनलला बहुमत मिळाले. त्यांना  पैकी 8 जागांवर विजय संपादन करता आला. पालम तालुक्यातील आरखेड ग्रामपंचायत शेकाप-राष्ट्रवादी आघाडीच्या पॅनलचा विजय झाला. त्या ठिकाणी 9 पैकी 6 जागांवर त्यांना विजय मिळविता आला. परभणी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या झरी गावात जनसेवा पॅनलचे 11 उमेदवार विजयी झाले. ही ग्रामपंचायत 17 सदस्यांची आहे.  त्यांचे प्रतिस्पर्धी शिवस्वराज्य पॅनलला 6 जागा मिळाल्या. शिवसेने जिल्हा परिषद सदस्य गजानन देशमुख यांच्या पॅनलचा हा विजय आहे. पाथरीच्या उमरा ग्रामपंचायत मध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.

काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे 3 पॅनल उभे होते कुणालाही बहुमत मिळालेले नाही. रामेटाकळी ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाधर कदम यांच्या पॅनलने विजय 9 पैकी 9 जागांवर विजयी मिळविला आहे. उक्कलगाव ग्रामपंचायत विद्यमान सरपंच नाथा पिंपळे यांच्या पॅनल ने 9 पैकी 9 जागा जिंकल्या. पंचायत समिती सभापती प्रमिला उक्कलकर यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. कोल्हा ग्रामपंचायत मध्ये मानवत पंचायत समितीचे माजी सभापती नारायण भिसे यांच्या पॅनलने 11 पैकी 9 जागा जिंकत विजय मिळवला. परभणी तालुक्यातील मांडाखळी गावात राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या परिवर्तन पॅनलचा 11 पैकी 9 जागांवर विजय मिळविला आहे.

पाथरी तालुक्यातील प्रतिष्ठेची  बाभळगाव ग्राम पंचायतीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना गटाने 11 पैकी 10 जागा जिंकुन वर्चस्व सिद्द  केले आहे. प्रस्थापित काँग्रेसचे नेते सर्जेराव गिराम यांच्या गटाचा दारुण पराभव झाला आहे.  परभणी तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची ग्राम पंचायत असलेल्या जांब गावात शिवसेनेचे वर्चस्व सिध्द झाले आहे. या ठिकाणी  शिवसेनेकडून आमदार डॉ राहुल पाटील यांचे समर्थक संग्राम जामकर याच्या पॅनलने 13 पैकी 11 जागांवर विजय मिळविला आहे. काँग्रेसकडुन माजी खासदार तुकाराम रेंगे यांचे चिरंजीव तथा जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब रेंगे यांच्या पॅनलला केवळ दोनच जागा मिळाल्या आहेत. 

परभणी तालुक्यातील सुरपिंपरी ग्रामपंचायत कामगार नेते विलास बाबर यांच्या गटाकडे गेली आहे. बाबर गटाचा 9 पैकी 9 जागांवर विजय झाला आहे. बोरी (ता.जिंतूर) ग्राम पंचायत मध्ये 17 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला आहे. या ग्रामपंचायतीकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या गटाचा विजय हा विजय मानला जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com