BJP : लोकसभा, विधानसभेसाठी भाजपचा शड्डू! 'या' मतदार संघात इच्छुकांची नावे घोषित | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

BJP : लोकसभा, विधानसभेसाठी भाजपचा शड्डू! 'या' मतदार संघात इच्छुकांची नावे घोषित

परभणी : भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली असून, परभणी लोकसभा व विधानसभा मतदार संघांसाठी शड्डू ठोकला आहे. या संदर्भात भाजप महानगर शाखेची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. त्यात आगामी विधानसभा व लोकसभा ताकदीने लढविण्याचे सुतोवाच केले आहे. तसेच संभाव्य उमेदवारांची नावेदेखील घोषित केली आहेत.

परभणी जिल्ह्यातील चारपैकी जिंतूर विधानसभा मतदार संघ भाजपच्या ताब्यात आहे. गंगाखेड मतदार संघ मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या ताब्यात आहे. परभणी विधानसभा मतदार संघ शिवसेनेकडे (ठाकरे गट) असून, पाथरी विधानसभा मतदार संघ काँग्रेसकडे आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे.

विकास रखडलेलाच

पत्रकारांशी संवाद साधताना विजय वरपुडकर म्हणाले, ‘‘परभणी विधानसभा गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेकडे (ठाकरे गट) आहे. परंतु, या मतदार संघाचा विकास म्हणावा तसा झालेला नाही. पाच वर्षांपासून परभणी बसस्थानकाचे काम रखडलेले आहे. ठाकरे गटाचे आमदार काय करतात? असा प्रश्नही श्री. वरपुडकर यांनी उपस्थित केला. स्वतःचे मेडिकल कॉलेज तातडीने सुरू करता येते. पण, सर्वसामान्यांसाठी असलेले बसस्थानकांच्या बाबतीत स्थानिक आमदार गंभीर नाहीत ही शोकांतिका आहे.

या आमदारांना सर्वसामान्यांशी काही घेणे-देणे नाही. त्यांना केवळ संस्था चालवायच्या आहेत. त्यामुळे संपूर्ण मतदार संघात विद्यमान आमदारांविरोधात चीड निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपने चांगले मतदान घेतले आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही भाजपकडे जनमत आहे’’, असा दावा त्यांनी केला.

यावेळी राजेश देशपांडे, प्रमोद वाकोडकर, मोहन कुलकर्णी, संजय शेळके, दिनेश नरवाडकर, सुप्रिया कुलकर्णी, मंगल मुदगलकर, कमलकिशोर अग्रवाल, शंतनू सुभेदार, सुनील देशमुख, नितीन वट्टमवार, बाळासाहेब भालेराव, लक्ष्मीकांत क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.

विधानसभेसाठी चार जण इच्छुक

परभणी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी भाजपच्यावतीने चार जण इच्छुक आहेत असेही विजयराव वरपुडकर यांनी सांगितले. त्यात महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, संजय शेळके, डॉ. मीना परतानी आणि मी स्वतः निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. त्याच बरोबर लोकसभा निवडणुकीसाठीदेखील भाजपच्यावतीने तीन दावेदार आहेत. त्यात माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी मंत्री बबनराव लोणीकर व अन्य एकजण असल्याचेही श्री. वरपुडकर यांनी सांगितले.

महापालिकेतही आम्हीच किंगमेकर

आगामी महापालिका निवडणुकीत भाजप सर्व जागा लढविणार आहे. त्यामुळे सत्ता कुणाचीही असो भाजपच्या नगरसेवकांना सोबत घेतल्याशिवाय महापालिकेत सरकार स्थापन करता येणार नाही. त्यामुळे या ठिकाणी आम्ही किंगमेकरच्या भूमिकेत राहू असे विजयराव वरपुडकर यांनी सांगितले.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही परभणी विधानसभा निवडणूक मोठ्या ताकदीने लढविणार आहोत. या विधानसभेतील जनमत आमच्या बाजूने आहे. त्यामुळे यावेळी निश्चित भाजपचा उमेदवार या विधानसभेतून विजय संपादन करेल.

- विजयराव वरपुडकर, भाजप ज्येष्ठ नेते

टॅग्स :BjpParbhaniShiv Sena