सुनेचा खून करून सासऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

पळून  गेलेल्या दामोदरचा शोध सुरु केला असता, त्यांच्या शेतातील एका झाडाला त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले

पाथरी - चारित्र्याच्या संशयावरून सुनेचा खून करून सासऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नाथरा  (ता.पाथरी, जि.परभणी) येथे शुक्रवार (ता.नऊ) पहाटे घडली. नाथरा (ता. पाथरी) येथील विवाहिता सुमीत्रा अन्सीराम डुकरे (वय 25) या दोन  दिवसापुर्वीच माहेराहून सासरी आल्या होत्या. दोन दिवसापासून त्यांचा सासरा दामोदर रामभाऊ डुकरे (वय 70) हे त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून दोघामध्ये वादही झाले होते अशी माहिती पोलिसांनी दिली.

दररोज प्रमाणे मयत सुमित्रा, त्यांचे पती रामभाऊ व एक मुलगी घरात गुरुवारी (ता.आठ) घरात झोपले होते. रात्री 12  वाजण्याच्या सुमारास घरात गरमी होत असल्याने रामभाऊ व त्यांची मुलगी घराबाहेर  येऊन झोपले. त्यानंतर एक वाजण्याच्या सुमारास सासरा दामोदर याने घरातील लोखंडी  पहारीने झोपलेल्या सुमित्राच्या डोक्यात वार केले. या आवाजाने घराबाहेर झोपलेला रामभाऊ व त्याची मुलगी पळत घरात आले. त्यावेळी सुमित्रा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडल्याचे त्यांना दिसले. रामभाऊ येताच सासरा दामोदर याने घरातून पळ  काढला. रामभाऊने आरडा - ओरड करून गावातील लोकांना गोळा केले.

पोलिसांना  घटनेची माहिती देण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी रेणुका वागळे 
यांच्यासह पोलिस निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पळून  गेलेल्या दामोदरचा शोध सुरु केला असता, त्यांच्या शेतातील एका झाडाला त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

या प्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती 
पोलिस निरीक्षक सोहम माछरे यांनी दिली.

Web Title: parbhani news: murder crime

टॅग्स