सेलू पोलीस ठाण्याचा कारभार निम्म्या कर्मचार्‍यांवर,अवैध धंदे जोरात | Parbhani News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Selu Police Station
सेलू पोलीस ठाण्याचा कारभार निम्म्या कर्मचार्‍यांवर,अवैध धंदे जोरात

सेलू पोलीस ठाण्याचा कारभार निम्म्या कर्मचार्‍यांवर,अवैध धंदे जोरात

सेलू (जि.परभणी) : येथील पोलीस ठाण्याचा कारभार निम्म्याच कर्मचार्‍यांवर चालत असल्यामुळे अवैध धंद्यासह भुरटे चोर चांगलेच सक्रिय झाले आहेत. पोलिस कर्मचार्‍यांची संख्या अपुरी असल्याने कायदा व सुव्यवस्थेची शहरात त्रेधातिरपट उडतांना दिसत आहे. येथील पोलीस ठाणे निजामकालीन आहे. सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत (Selu Police Station) तब्बल ६४ गावे येतात. पोलीस ठाण्यात एकूण ७४ पोलीस कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. यात एक पोलीस निरीक्षक, दोन सहायक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक आणि इतर कर्मचारी असे ७४ पोलीस कार्यरत असणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस शहराचा चोहोंबाजूने वेगाने विस्तार होत आहे. त्यामुळे (Parbhani) शहरातील कायदा, सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. तसेच रात्रीची गस्त, गुन्ह्यांचा तपास, मोर्चा, आंदोलन, मंत्र्यांचे दौरे आदी कामासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो. परंतु पोलीस कर्मचाऱ्यांची तब्बल ३७ पदे रिक्त असल्याने कार्यरत पोलीस कर्मचार्‍यांवरच कामाचा ताण वाढला आहे. दरम्यान, ६४ गावे आणि विस्तारलेल्या शहरांची लोकसंख्या लक्षात घेता पोलीस कर्मचाऱ्यांची पदे तत्काळ भरावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचा: निम्म्या किंमतीत झिरो डाऊन पेमेंटवर खरेदी करा Renault Kwid

पोलीस ठाण्याची इमारत मोडकळीस

येथील पोलीस ठाण्याची निजामकालीन इमारत मोडकळीस आली आहे. नवीन इमारतीचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून पडून आहे. भौतिक सुविधा व्यवस्थित नसल्याने अनेक अडचणींना तोंड देत कर्मचाऱ्यांना कामकाज करण्याची वेळ पोलिस कर्मचार्‍यांवर आली आहे.

चोऱ्यांचे प्रमाण वाढले...

मागील काही दिवसांपासून शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरू आहे. तसेच घरफोडी करून अज्ञात चोरटे लाखोंचा माल पळवित असल्याच्या घटना शहरात वारंवार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांनी रात्रीची गस्त सुरू करावी

पोलीस ठाण्यात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता चोरीच्या घटना रोखण्यासाठी त्या-त्या भागातील नागरिकांनी रात्रीची गस्त सुरू करावी. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास चोरीला आळा बसू शकतो, असे आवाहन पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी केले आहे.

loading image
go to top