पांगरगावचा तरुण शेतकरी नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

सहा तासानंतर प्रेत सापडले; प्रशासनाची मदत नाही

मुदखेड ः पांगरगाव (ता. मुदखेड) येथील एक तरूण शेतकरी शेतात असलेल्या आपल्या वडिलांच्या जेवणाची भाकरी घेऊन शेताकडे जाताना पुरात वाहून गेल्याची घटना रविवारी (ता. २०) राेजी घडली अाहे. या घटनेत महसुल अथवा पोलिस प्रशासनाकडून अद्याप या कुटुंबास कसल्याच प्रकारची मदत मिळाली नसल्याचे गावकऱ्यांकडुन सांगण्यात आले.

पांगरगांव (ता.मुदखेड) येथील तरूण संभाजी जगन्नाथ तळणे, (वय ३५) हा सकाळी १० वाजता घरून शेतात असलेल्या आपल्या वडीलांच्या जेवणाचा डबा घेऊन शेताकडे जात असतांना पांगरगांव ते पिंपळकौठा (चोर) रस्त्यावर असलेल्या नदीच्या पुलावरून जात असताना अचानक पाण्याचा लोट जोरात आला व शेतकरी संभाजी हा पुलावरून वाहुण गेल्याची घटना घडली. यामुळे पांगरगावसह तालुक्यावर शोककळा पसरली आहे. (ता.२०) रोजी सकाळी तरुण शेतकरी संभाजी तळणे हा पुलावरून पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेल्याची माहिती कुटुंब व गावकऱ्यांना मिळताच नदी परिसरात शोधमोहीम सुरू केली असता तब्बल सहा तास शोधाशोध केली असता त्या पुलापासून गावाच्या दक्षिणेस एक किलोमिटर अंतरावर दुपारी चार वाजता झुडपाजवळ त्याचे प्रेत अडकल्याचे आढळले.

गावातील तरुणांनी संभाजीचे प्रेत पाण्याबाहेर काढले. घटनेची माहिती गावकऱ्यांनी महसुल व पोलिस प्रशासनास सकाळीच दिली होती परंतु या कामी प्रशासनाकडुन प्रेत सापडेपर्यंत कोणतेच मदत कार्य मिळाले नाही. गावकऱ्यांनी मयत संभाजी तळणे यांचे प्रेत मुदखेड ग्रामीण रूग्णालयात आणले असता मुदखेड पोलिसांनी पंचनामा करूण शवविच्छेदनासाठी रुग्णालय प्रशासनाकडे सोपवले. मयत संभाजी तळणे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.

Web Title: parbhani news pangargaon farmer drowned