गौण खनिजाच्या बोगस पावत्या, फसवणुकीचा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जुलै 2017

गेल्या वर्षीही सोनपेठ तालुक्यातील वाळू घाटावरच्या बनावट पावत्या सापडल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या वर्षीही सलग दुसऱ्यांदा बनावट पावत्या सापडल्याने महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे.

सोनपेठ (परभणी) : सोनपेठ तालुक्यातील वाळू धक्क्यावर बनावट पावत्या सापडल्या प्रकरणी सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलग तिसऱ्या वर्षीही बनावट पावत्या सापडल्याने एकच खळवळ उडाली आहे.

सोनपेठ तालुका जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने अवैध वाळूचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी अतिशय सोयीचा आहे. काही स्थानिक लोकांना हाताशी धरून बाहेरील लोक हा वाळूचा व्यवसाय करतात. हा व्यवसाय करताना हे व्यवसायिक नावालाच प्रशासनाकडून धक्का घेतात. पण नंतर हा धक्का मात्र पूर्णपणे अवैधरीत्या चालविला जातो. नेमून दिलेल्या क्षमतेच्या कितीतरी अधिक वाळूचा उपसा करण्यात येतो यासाठी सर्रास बनावट पावत्या छापून वापरल्या जातात. तालुक्यात खऱ्या पावत्या वापरल्या जातात तर पुढे दुसऱ्या जिल्ह्यात बनावट पावत्या वापरल्या जातात. दुसऱ्या जिल्ह्यात या पावत्या तपासल्या जात नाहीत. पण गेल्या तीन वर्षापासुन सोनपेठ तालुक्यातील बनावट पावत्या सापडत असुन या बाबत गुन्हा दाखल होऊन ही फारसा तपास केला जात नाही.

या वर्षी कान्हेगाव येथील वाळू धक्क्यावरील बनावट पावत्या सापडल्या आहेत. जून महिन्यात अंबेजोगाई येथे पोलिस व महसूल अधिकाऱ्यांनी अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या वाहानास पकडुन त्याची चौकशी केली असता त्याने सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव येथील वाळू धक्क्यावरील गौण खनिजाच्या पावत्या दाखवल्या. या पावत्या बनावट असल्याच्या संशयावरुन सदरील पावत्या परभणी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवल्या त्या बनावट असल्याचे त्यांनी कळवल्यावरुन कान्हेगाव येथील तलाठी यांनी सदरील वाळू वाहतुकदार दिपक मस्के रा. भावठाणा याच्या विरुद्ध बनावट पावत्या वापरुन शासनाची फसवणुक व नुकसान केल्या प्रकरणी कलम ४२०, ४६८, ४७१, ३७९ भादवि व ४८(७)(८) नुसार गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक सदानंद येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष मुपडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

वाळू घाटावर देण्यात येणाऱ्या पावत्या या जिल्हा गौण खनिज अधिकाऱ्या मार्फत देण्यात येतात या पावत्या बारकोड व इतर सुरक्षा मानकासह छापण्यात येतात. पण दरवर्षी वेगवेगळ्या धक्क्यावर सापडणाऱ्या बनावट पावत्या मुळे या बनावट पावत्यांच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. या बनावट पावत्या प्रकरणात मुख्यसुत्रधार पकडणे गरजेचे आहे. दरवर्षी अशा हजारो पावत्या छापुन शासनाचा करोडो रुपयाचा महसूल बुडवल्या जातो. विषेश म्हणजे या बनावट पावत्या फक्त दुसऱ्या जिल्ह्यातच सापडतात. वाळू व्यवसायिक ह्या पावत्या दुसऱ्या जिल्ह्यातच वापरतात की जिल्ह्यातील अधिकारी या पावत्यांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करतात हा गंभीर प्रश्न आहे. आज पर्यंत सोनपेठ पोलिसात दाखल झालेल्या एकाही गुन्ह्याचा तपास  पोलिसांना लागलेला नाही.

Web Title: parbhani news sonpeth sand mafia fake receipts mining