esakal | परभणी : राम जन्मोत्सव कोरोना नियमात साजरा; घरीच साजरा केला उत्सव

बोलून बातमी शोधा

परभणी रामनवमी
परभणी : राम जन्मोत्सव कोरोना नियमात साजरा; घरीच साजरा केला उत्सव
sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः सर्व हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या प्रभु श्री राम यांचा जन्मोत्सव बुधवारी (ता. 21) कोरोना नियमाचे पालन करित साजरा करण्यात आला. मुख्य पुजाऱ्यांसह इतर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा पार पडला. मंदिरे बंद असल्याने परभणीकरांनी घरोघरीच राम जन्माचा सोहळा साजरा करून प्रभु रामचंद्राचे मनोभावे दर्शन घेतले.

परभणी शहरातील अनेक राम मंदिरे आहेत. त्यापैकी महत्वाचे म्हणजे टाकळकर परिवाराचे सर्वात पुरातन राम मंदिर हे गांधी पार्क परिसरात आहे. त्याच बरोबर दुसरे पुरातन मंदिर म्हणजे पावडे गल्लीतील श्रीराम मंदिर आहे. त्यानंतर सुभाष रस्त्यावरील श्री. बालाजी मंदिर संस्थानमध्येही राम जन्मोत्सव साजरा होत असतो. प्रभावती नगर जवळील श्री. प्रल्हाद राम मंदिरातही राम जन्माचा सोहळा मनमोहक असतो. परंतू यंदा कोरोना विषाणु संसर्गामुळे शहरातील मंदिरे बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे गेल्या 15 ते 20 दिवसापासून मंदिरे बंद आहेत.

हेही वाचा - दातृत्वाची जाण असणाऱ्यांकडूनच सामाजिक भान जपले जाते

बुधवारी (ता.21) रामजन्मोत्सव सोहळा साजरा झाला. परंतू यावेळी मंदिरातील मुख्य पुजाऱ्यांसह केवळ तीन ते चार व्यक्तीच्या उपस्थितीतच हा सोहळा घेण्यात आला. दुपारी 12 वाजता शहरातील सर्वच मंदिरात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. टाकळकर राम मंदिरात दुपारी 12 वाजता जन्मोत्सवाचा सोहळा मंत्रोच्चारात साजरा झाला. यावेळी रामाचा पाळणा देखील गाण्यात आला. पावडे गल्लीतील राममंदिरातही बरोबर 12 वाजता रामजन्म उत्सव झाला. श्री बालाजी मंदिर संस्थान मध्ये महंत अखिलेशदास बाबाजी यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर सर्वच मंदिरातून प्रसादाचे वाटप करण्यात आले. मोजकीच उपस्थिती असल्याने जन्मोत्सव संपल्यानंतर परत मंदिरे परत बंद करण्यात आली.

संपादन- प्रल्हाद कांबळे