परभणी : गोमांस घेवून जाणारे वाहन पोलिसांनी केले जप्त, विशेष पथकाची कारवाई

गणेश पांडे
Friday, 18 December 2020

परभणीहुन पाथरीकडे गोमांस घेवून एक वाहन जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून अधिकारी- कर्मचाऱ्यांना पेडगाव फाटा येथून परभणीकड़े येताना बगीचा ढाब्याजवळ एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनाला थांबवले.

परभणी ः पोलिसांच्या विशेष पथकाने गुरूवारी (ता. 17) एक लाख साठ हजार रुपये किमतीचे आठशे किलो गोमांस जप्त केले. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

परभणीहुन पाथरीकडे गोमांस घेवून एक वाहन जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून अधिकारी- कर्मचाऱ्यांना पेडगाव फाटा येथून परभणीकड़े येताना बगीचा ढाब्याजवळ एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनाला थांबवले. वाहन चालकाची चौकशी केली. त्यावेळी त्याने त्याचे नाव मोमिन यसुफ़ मोमिन अजिम (रा.बीड) असे सांगितले. त्यास पथकाने वाहनांमध्ये काय आहे, असे विचारले. त्यावेळी त्याने गोमांस असल्याचे स्पष्ट केले. तसेच अब्दुल समद अब्दुल रहिम कुरेशी (रा.परभणी) यांचे ते असून खंडोबा बाजार परभणी येथून भरले असल्याचे त्याने सांगितले. पाथरी येथे घेऊन जात असल्याचे चालकाने सांगितले. यावेळी पथकाने वाहनाची पाहणी केली असता त्यात गोमांस ठेवले असल्याचे दिसून आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जे. के. सोळंके यांनी गोमांस असल्याचे स्पष्ट केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही कारवाई विशेष पथकाचे परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक बाबासाहेब दडस, फ़ौजदार विश्वास खोले, चंद्रकांत पवार, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, राहुल चिंचाणे, यशवंत वाघमारे, अजहर पटेल, ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी श्री.पठाण यांनी केली.

हेही वाचाहिंगोली : जिल्ह्यातील ढगाळ वातावरणाचा तूर, हरभरा पिकांना धोका 

शहरात तपासणी होण्याची शक्यता

शहरातून गोमांस बाहेर गावांना जात असल्याचा प्रकार या घटनेमुळे उघडकीस आला आहे. ही बाब गंभीर असून त्यावर तातडीने कारवाई करण्याच्या सुचना पोलिसांना वरिष्ठांनी दिल्या आहेत. दरम्यान, ही घटना घडल्यामुळे शहरात अन्य कुठे गोवंशाच्या कत्तली होतात का याची माहिती पोलिसांकडून घेतली जात असून असे आढळल्यास त्यांच्यावर कडक स्वरुपाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

संपादन-  प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: Vehicles carrying beef seized by police, action of special squad parbhani news