परभणी : प्रभाग रचनेच्या आक्षेपांवर बंद खोलीत सुनावणी

आता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष
Parbhani Commission Municipal Corporation
Parbhani Commission Municipal Corporationsakal

परभणी : महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या शहराच्या नविन प्रभाग रचनेवर आलेल्या हरकती, आक्षेपांवर मंगळवारी (ता.पाच) राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकारी वर्गाच्या समक्ष बंद खोलीत सुनावणी घेण्यात आली. वेळेच्या कारणावरून काहींनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागितल्यानंतर त्यांच्या आक्षेपांवर सुनावणी घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सुनावणीनंतर आक्षेप फेटाळले जाणार की, आक्षेपाप्रमाणे प्रभाग रचनेत बदल होणार हे पूर्णतः राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अवलंबून आहे.

महानगरपालिकेने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ता. आठ जून रोजी शहराची प्रभाग रचना प्रसिद्ध केली होती. महानगरपालिकेने लोकसंख्या व अन्य तांत्रिक बाबींचा आधार घेऊन शहराची २५ प्रभागांत विभागणी केली होती. त्यापैकी २४ प्रभाग हे तीन सदस्यीय तर एक प्रभाग चार सदस्यीय राहणार आहे. प्रसिद्ध झालेल्या प्रभाग रचनेवर पालिकेने ता. आठ ते २० जून दरम्यान हरकती, आक्षेप मागवले होते. शहरातील एकूण ५८ जणांनी विविध प्रभागांच्या सीमारेषा, लोकसंख्या आदींवर आक्षेप नोंदवले होते.

मंगळवारी (ता.पाच) या हरकती व आक्षेपांवर महानगरपालिकेच्या बी. रघुनाथ सभागृहातील सभागृह नेते यांच्यासाठी दिलेल्या दालनात सुनावणी घेण्यात आल्या. राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत अधिकारी महाबीजचे मॅनेजिंग डायरेक्टर रुचेश जयवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्य निवडणूक आयोगाचे अव्वर सचिव अतुल जाधव, विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी समीक्षा चंद्रकार, अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर, आयुक्त देविदास पवार, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपायुक्त महेश गायकवाड यांच्यासह नगरसचिव विकास रत्नपारखे, संगणक विभागाचे अदनान कादरी यांची उपस्थिती होती.

पालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रभाग रचनेमुळे अनेक बडे, इच्छुक, आजी-माजी लोकसेवक अडचणीत आल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेकांनी स्वतः तर काहींनी प्रतिनिधींच्या माध्यमातून आक्षेप दाखल केले होते. त्यावरील सुनावणीनंतर व प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या शिफारशीनंतर निवडणूक आयोग निर्णय घोषित करणार असून, येत्या पंधरा दिवसांत यावर निर्णय अपेक्षीत आहे. या निर्णयाकडे अनेक जण लक्ष ठेवून आहेत.

सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्त तैनात

बी. रघुनाथ सभागृह परिसरातील दालनात सकाळी ११ वाजता सुनावणी सुरु होताच काही तक्रारकर्त्यांनी बी. रघुनाथ सभागृहात व सर्वांच्या समक्ष सुनावणी घेण्याची मागणी केली. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी बहिष्कार घातला. त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी पालिकेने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता. सुनावणीच्या वेळी फक्त एका तक्रारकर्त्याला आपली बाजू मांडण्यासाठी दालनात सोडण्यात येत होते. दुपारी एकच्या सुमारास बाहेर तक्रारकर्ते नसल्यामुळे सुनावणी बंद करण्यात आली. पुन्हा काही तक्रारकर्ते आले व त्यांनी सुनावणी घेण्याची मागणी केली. अनेकांनी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे देखील दाद मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हाधिकारी यांच्या हस्तक्षेपानंतर त्यांच्या तक्रारीवर देखील सुनावणी घेण्यात आली. ५८ पैकी चार-पाच तक्रारकर्ते सुनावणीसाठी गैरहजर राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर आलेल्या हरकतींवर राज्य निवडणूक आयोगाच्या प्राधिकृत अधिकारी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या समक्ष सुनावणी झाली. झालेल्या सुनावणीनंतरची सर्व माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोग त्यावर निर्णय घेणार असून, दिलेल्या निर्णयानुसार पुन्हा प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल.

-रणजित पाटील, अतिरिक्त आयुक्त, मनपा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com