परभणीकरांनो सावधान... उन्हाळ्यातही नियमित पाण्याची शक्यता धुसर 

NND20A90833.1
NND20A90833.1

परभणी ः नवीन व जुनी पाणीपुरवठा योजना सुरू ठेवण्यासाठी दरमहा अंदाजे सव्वा कोटी रुपये खर्च लागणार आहे. तो खर्च पाणीपट्टीतून मिळाल्यास योजना दीर्घकाळ नियमितपणे चालू राहू शकते, अशा प्रशासनाच्या स्पष्टीकरणाने समाधान न झालेल्या अनेक सदस्यांनी नळ जोडणी शुल्काला विरोध केला व त्यासाठी स्वतंत्र विशेष सभा घेण्याची मागणी केली. ती मागणी मंजूर करण्यात आली. त्यामुळे पुन्हा कधी सभा होणार, काय निर्णय होणार हे अनुत्तरीत असून उन्हाळ्यातही नियमित व मुबलक पाणी मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे.

बी. रघुनाथ सभागृहात गुरुवारी (ता.१६) अनेक महिन्यांच्या खंडानंतर नवनिर्वाचित महापौर अनिता रवींद्र सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. या वेळी उपमहापौर भगवान वाघमारे, आयुक्त रमेश पवार, नगरसचिव विकास रत्नपारखे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. विषयपत्रिकेवरील दोन-तीन विषय वगळता सर्व विषयांना झटपट मंजुरी देण्यात आली.

नळजोडणीच्या दराला काहींचा विरोध
या बैठकीत अमृत अभियानांतर्गत वितरण व्यवस्थेवर नळ जोडणीसाठी शुल्क आकारण्याच्या विषयाबाबत आयुक्त रमेश पवार, शहर अभियंता वसीमखान पठाण यांनी सविस्तर माहिती दिली. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने नळजोडणीसाठी १२ हजार रुपये दर निश्चित केले होते. परंतु, संबंधित एजन्सीशी चर्चा करून तो दर दहा हजार रुपये व महानगरपालिकेचे नळजोडणी शुल्क चार हजार रुपये असा १४ हजार दर निश्चित करण्यात आला आहे. योजना दीर्घकाळ सुरळीतपणे चालू ठेवायची असेल तर सर्व सदस्यांनी नागरिकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनदेखील या वेळी आयुक्त श्री. पवार यांनी केले. या वेळी श्रीमती नाझनीन पठाण, मोकिंद खिल्लारे, सचिन अंबिलवादे, सुशील कांबळे, प्रशास ठाकूर, इम्रानलाला, सचिन देशमुख, विकास लंगोटे यांनी हे दर सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याचे सांगितले. सर्वांना सारखे दर नको, ज्यांना पाणी मिळत नव्हते त्यांच्याकडून जुनी पाणीपट्टी घेऊ नये, जुन्या नळधारकांची ठेव रक्कम नवीन ठेव रकमेत वर्ग करावी व त्यासाठी विशेष सभा घेण्याची मागणी केली.

कोण काय म्हणाले...
या वेळी स्थायी समितीचे सभापती सुनील देशमुख म्हणाले, ‘‘लोक पाण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे शहरात आलेले पाणी त्यांना देणे आवश्यक आहे. तसेच ही योजना सुरू ठेवण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचादेखील सभागृहाने विचार करावा.’’ उपमहापौर भगवान वाघमारे म्हणाले, ‘‘योजना पूर्ण झाली; परंतु ती चालवण्याची जबाबदारी आपली आहे. आपण यासाठी विशेष सभा घेऊ. लोकांना खूश करण्याचे न पाहता योजना चालवायची का नाही हे ठरवा.’’वॉटर मीटरचे त्यांनी जोरदार समर्थन केले. सर्वांना सारखे दर न लावता अंतराप्रमाणे दर लावा, असेही त्यांनी सुचविले व त्यासाठी विशेष सभा घेण्याचे ठरले.

लॉयन्स क्लबला नेत्र रुग्णालयासाठी इमारत
लॉयन्स टॅरिटेबल ट्रस्टला भाडेतत्वावर इमारत देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. या वेळी सदस्य इम्रानलाला यांनी पीपल्स बॅंकेची आपण जमीन दिली व आता ती खासगी कशी झाली? असा प्रश्न उपस्थित केला. तत्कालीन नगरपालिकेने पीपल्स बॅंकेला ही जागा रजिस्ट्री करून दिल्याची माहिती रईसखान यांनी दिली. त्याचे कागदपत्र द्या, अशी मागणी त्यांनी केली.

रहदारीतील अडथळ्यांबाबत कठोर निर्णय घ्या
शहरातील ट्रॅफिक सिग्नल व पार्किंगबाबत सचिन अंबिलवादे यांनी अनेक आक्षेप नोंदविले. पार्किंगच्या जागा ‘पे अॅंड पार्क’, शनिवार बाजार येथे पार्किंग करण्याची मागणी त्यांनी केली. शहर वाहतूक शाखा वसूल करीत असलेल्या दंडातून पालिकेचा हिस्सा घेण्याची मागणी अतुल सरोदे यांनी केली. तर शहरातील वाहतुकीतील अडथळ्यांबाबत कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे, हॉकर्स झोन तत्काळ करा, रस्ते मोठे करावेत, अशी मागणी सुनील देशमुख यांनी केली. माजी महापौर मीना वरपुडकर यांनी सिग्नल यंत्रणा चालू करण्याची मागणी केली.


सभागृहनेतेपदी माजुलाला
महापालिकेच्या सभागृह नेते माजी उपमहापौर सय्यद समी सय्यद साहेबजान उर्फ माजुलाला यांची निवड झाल्याची घोषणा महापौर अनिता सोनकांबळे यांनी केली. तसेच या वेळी स्थायी समितीच्या सदस्यपदी राष्ट्रवादीच्या नाझियाबेगम मो. रहीम व विजय ठाकूर यांची निवड झाली. शिवसेनेचे प्रशास ठाकूर यांच्या जागेवर श्री. ठाकूर यांची निवड झाली.

उर्वरित विषयांना मंजुरी
या वेळी स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहराने शहर ओडीएफ प्लस प्लस, तीन स्टार मानांकनाचे निकष पूर्ण केल्यामुळे त्यावर साधक बाधक चर्चा झाली. मानांकन देण्यासारखे शहरात काही दिसून येत नाही, असे म्हणून श्रीमती नाझनीन पठाण यांनी ठरावास विरोध दर्शविला. परंतु, उर्वरित सर्वांनी त्यास मान्यता दिली. या वेळी एक विषय वगळता उर्वरित विषयांना मंजुरी देण्यात आली. तसेच या वेळी राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

कटप्पा अन् गीतांजली एक्सप्रेस
या वेळी ज्येष्ठ सदस्य लियाकत अन्सारी यांनी शहर अभियंता वसीमखान पठाण यांनी कटप्पाची उपमा दिली. ज्यांची सत्ता आहे, त्यांच्या मर्जीप्रमाणे ते वागतात, असे ते म्हणाले. तर उपमहापौर भगवान वाघमारे यांनी सदस्य नाझनीन पठाण यांना सतत व वेगाने बोलत असल्याने गीतांजली एक्सप्रेसची उपमा दिली. त्या वेळी सभागृहात एकच हशा पिकला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com