साई जन्मभूमीचा विकास हवा, त्यावर वाद नको 

धनंजय देशपांडे
गुरुवार, 16 जानेवारी 2020

पाथरीत झालेल्या बैठकीत निर्णय
विकासासाठी कृती समितीची स्थापना

पाथरी ः साई जन्मभूमीच्या विकासासाठी प्रस्तावित केलेल्या १०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिल्यानंतर ‘साई जन्मभूमी’चा वाद चांगलाच पेटला आहे. दरम्यान, गुरुवारी (ता.१६) ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकीत शिर्डीकरांकडून जन्मभूमीला होणाऱ्या विरोधावर चर्चा झाली. तर जन्मभूमीच्या विकासासाठी एक कृती समिती स्थापन करण्यात आली.

साई जन्मभूमी असलेल्या पाथरी या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (ता.नऊ) जानेवारी रोजी औरंगाबाद येथील बैठकीत शंभर कोटीच्या विकास आराखड्यास मंजुरी दिल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर शिर्डीचे महत्त्व कमी होईल, या कल्पनेमुळे शिर्डीकरांकडून पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी नसल्याचे विधान करून वाद सुरू केला आहे.

हेही वाचा - रेडिमेडची समाजमनावर अशीही मोहिनी : कशी ते वाचा

बैठकीस यांची उपस्थिती
गेल्या दोन दिवसांपासून जन्मभूमीचा वाद भक्तातून चर्चिला जात असताना गुरूवारी (ता.16) रोजी साई मंदिरात सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची व पाथरीकरांची बैठक झाली. आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, माजी नगराध्यक्ष मुंजाजी भाले, मंदिर विश्वस्थ संजय भुसारी, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा भावना नखाते, शिवसेना तालुकाप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे, बाजार समितीचे सभापती अनिल नखाते, माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब टेंगसे, सुभाष कोल्हे, चक्रधर उगले, सदाशिव थोरात, उद्धव नाईक यांची उपस्थिती होती. 

पाथरीचा विकास झाल्यास शिर्डीवर परिणाम नाही
या वेळी आमदार दुर्रानी यांनी साई मंदिराच्या पायाभरणीपासून आजपर्यंतचा आढावा मांडला. ते म्हणाले, साईबाबांच्या श्रद्धा व सबुरी या मंत्राप्रमाणे तीस वर्षानंतर फळ मळत असून त्यालाही शिर्डीकरांकडून विरोध केला जात आहे. अनेक पुस्तकातील जुन्या पुराव्यांना लपवण्याचे काम शिर्डी संस्थांनकडून होत आहे. साईबाबा एकच असून पाथरीचा विकास झाल्यास शिर्डीवर काहीही परिणाम होणार नसून मोठ्या मनाने त्यांनी जन्मभूमीला मानावे असे सांगितले. 

हेही वाचा - शहराच्या विकासाला अतिक्रमणांचा रोग : कोणतं आहे हे शहर

आमदार बाबाजानी दुर्रानी अध्यक्ष
या वेळी संजय भुसारी यांनी पाथरी साईबाबांची जन्मभूमीबाबत माहिती देत जन्मभूमी विकासासाठी कृती समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. या वेळी सर्वानुमते आमदार बाबाजानी दुर्रानी यांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. बैठकीला पाथरी तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी, वकील, डॉक्टर, पत्रकार, व्यापारी तसेच हजारो भाविक उपस्थित होते.

आमच्याकडे २९ पुरावे
पाथरी ही साई जन्मभूमी असल्याचे आमच्याकडे २९ पुरावे असून शिर्डीकरांकडे एकही पुरावा नाही. आम्हाला वाद घालायचा नाही तर जन्मभूमी असल्याने पाथरीचा विकास साधायचा आहे.
-बाबाजानी दुर्रानी, आमदार.

‘सकाळ’चे मानले आभार...
काही दिवसांपूर्वी ‘सकाळ’ ने १०० कोटींचा आराखडा लालफितीत या आशयाखाली साई मंदिराच्या विकासाबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. यानंतरच आराखड्याच्या पाठपुराव्यास गती आली होती. दरम्यान, १०० कोटींच्या आराखड्यास मंजुरी मिळाल्याने आमदार बाबाजानी दुर्रानी व साई मंदिर समितीने ‘सकाळ’चे आभार मानले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sai should develop the homeland, not argue about it