परभणीकरांची पूर्ण दिवाळीच कुडकुडणाऱ्या थंडीत जाणार

गणेश पांडे
Wednesday, 11 November 2020

बुधवारचे तापमान 8 अंशावर ; थंडीचा जोर वाढण्याची शक्यता

परभणी : शहर व परिसरात थंडीचा कडाका चांगलाच  वाढू लागला असून बुधवारी (ता. 11) कमाल 8 अंश सेल्सियस  तापमानाची नोंद घेण्यात आल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाड़ा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. सलग तिसऱ्या दिवशीही परभणीकरांनी कुडकुडणारी थंडी अनुभवली. दरम्यान, आगामी दिवाळीच्या सणातही थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान केंद्राच्यावतीने वर्तविण्यात आली आहे.

 

या महिन्याच्या सुरवातीपासुन तापमानात मोठी घट होऊ लागली आहे. मंगळवारी 8 अंशावर तापमान आले. गुरुवारी (ता.पाच) 11.8 इतके, शुक्रवारी (ता.सहा) 11 अंश सेल्सीअस इतके तापमान नोंदले गेले, शनिवारी (ता.सात) रोजी 12.6 होते, रविवारी (ता. आठ) हे तापमान 11.4 इतके नोंदवले गेले. तर सोमवारी (ता. नऊ) 8.8, मंगळवारी (ता.दहा) 8.5 तर बुधवारी पहाटे 8 अंश तापमान नोंदवन्यात आले.  परभणीचे तापमान नोव्हेंबर महिण्यात दरवर्षी 14 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते. परंतू यंदा प्रथमच हे तापमान 8 अंशावर आले आहे.

हेही वाचा जिंतूरात मुख्य रस्त्यावर तीन ठिकाणी धाडसी चोऱ्या : चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद : पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान.

आगामी तीन दिवसात आणखी तापमान खाली येण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामान केंद्राने व्यक्त केली आहे. नोव्हेंबर महिण्यामध्ये 14 ते 15 अंशावर राहणारे तापमान डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक घसरणीवर राहते. ता. 29 डिसेंबर 2018 मध्ये हे तापमान 2 अंश सेल्सिअस इतक्या खाली घसरले होते. ता. 17 जानेवारी 2003 मध्ये ते 2.8 तर ता. 18 डिसेंबर मध्ये 3.6 इतके राहिले होते. दरम्यान, अचानक थंडी कमी झाल्याने पहाटे फिरणाऱ्यांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. कृषी विद्यासपीठात भल्या पहाटेपासुन 'मॉर्निंग वॉक'साठी गर्दी होऊ लागली आहे.

2005 साली याच दिवशी 6.5 अंशाची नोंद

परभणी शहराचे तापमान दिवसेदिवस खाली घसरत आहे. परंतू हा प्रकार यंदाच नाही तर तो गेल्या काही दिवसापासून होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. 11 नोव्हेंबर 2005 साली परभणीचे तापमान 6.5 अंश सेल्सिअस इतक्या खाली गेले होते.  त्याच बरोबर तापमानाचा हा पारा नोव्हेंबर पासून डिसेंबर व जानेवारी महिण्यापर्यंत उतरत असल्याची ही अनेक उदाहरणे आहेत.

आगामी तीन ते चार दिवसात तापमानाचा पारा आणखी खाली उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवसात परभणीकरांना बोचरी थंडी अनुभवण्यास मिळणार आहे. त्यानंतर मात्र तापमान थोडे अजून वर सरकू शकते.

- प्रा. डॉ. के. के. डाखोरे, प्रमुख, कृषी हवामान केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी

संपादन - प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhanikar's entire Diwali will go in the bitter cold parbhani news