अभ्यास करीत नाही म्हणून पालक देतात चमच्याने चटके!

अभ्यास करीत नाही म्हणून पालक देतात चमच्याने चटके!

औरंगाबाद - ‘आम्ही त्याला कुत्र्यासारखं मारतो. मरुस्तर मारतो; पण काही केल्या तो ऐकत नाही. अजिबात अभ्यास करीत नाही. म्हणून आम्ही त्याला धाक बसावा म्हणून चमच्याचे चटके दिले!’ विश्‍वास बसणार नाही; पण हे बोल आहेत एका आईचे! ‘प्रेमाचे दुसरे नाव आई’ असे ज्या इयत्तेत शिकवले जाते, त्याच दुसरीतल्या चिमुकल्याला घरी आईची अशी दहशत सहन करावी लागतेय.

ज्यांच्याकडे पाहून मनात वात्सल्य उचंबळून यावे, अशा पहिली-दुसरीतल्या गोंडस मुलांना घरी आई-वडील अभ्यासाच्या कारणावरून क्रूर शिक्षा करीत असल्याच्या काही घटना शहरातील डॉक्‍टर, मानसोपचार तज्ज्ञांकडे येणाऱ्या प्रकरणांमधून उघडकीस येत आहेत. 

रागावणे, मारणे, अशा शिक्षांच्या प्रकारांत पालकांनी अशी वेगवेगळ्या प्रकारांतून ‘निगेटिव्ह क्रिएटिव्हिटी’ दाखवायला सुरवात केली आहे. यामध्ये मुलांचा कोंडमारा होण्याबरोबरच या पालकांच्या मानसिकतेवरही विकृत परिणाम होत असल्याचे मनोविकार तज्ज्ञांनी म्हटले आहे.

घटना एक
दुसरीतील मुलगा अभ्यास करीत नाही म्हणून आई-वडिलांनी चमच्याने चटके दिले. एका सातवीतल्या मुलाला ट्यूशनच्या टेस्टमध्ये कमी मार्क पडले म्हणून आईने दोन दिवस उपाशी ठेवले. 

घटना दोन
एक पहिलीतील चिमुकलीला सारखी सू होऊन कपडे ओले होत. त्याच्या कारणांचा शोध घेताना तिला आईच्या सतत रागात बोलण्याची भीती बसल्याचे लक्षात आले. आई शांतपणे वागू लागताच तिची समस्याही आपोआप बंद झाली. 

घटना तीन
आई-वडिलांचे कडाक्‍याचे भांडण पाहूनच एका लहान मुलाची दातखिळी बसली. नशीब चांगले म्हणून तो मुलगा काही वेळाने नॉर्मल झाला.

मुलाला अद्दल घडवण्यासाठी...
अभ्यासाला बसत नाही, उलट उत्तरे देतो, या रागातून एका आईने मुलाला जन्माची अद्दल घडवायचं ठरवलं. मुलगा चिडून खोलीबाहेर जाताच तिने पंख्याला गळफास घेतला. दूधवाल्याने दार वाजवले म्हणून दुसऱ्या खोलीत कॉम्प्युटरवर काम करीत बसलेला पती उठून आला आणि त्याला हे भयानक दृश्‍य दिसले. त्याने तत्काळ तिला उतरवून दवाखान्यात दाखल केले. सुदैवाने ती वाचली खरी; पण नंतर मानसोपचार करावे लागले. 

शाळेत छडी बंद, घरातले काय?
शाळेत छडी बंद व्हावी, यासाठी देशभर मागण्या, निदर्शने, कायदेही झाले; पण घरातल्या मारहाणीचे काय, हा प्रश्‍न अनुत्तरितच आहे. पालकांचे नोकरी-व्यवसायातील दैनंदिन नैराश्‍य आणि शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झालेली जीवघेणी स्पर्धा याचा हा परिणाम असून, यावर गांभीर्याने विचार करायला हवा, असे मत डॉ. संदीप शिसोदे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. पालकांचे प्रबोधन करण्याबरोबरच मुलांच्या गुणविकासाचे अभ्यासाव्यतिरिक्त अनेक मार्ग आहेत, हे पटवून दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com