माध्यान्ह भोजनात आढळली पाल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

त्रिकोळी प्रशालेत पालकांचे आंदोलन

उमरगा (उस्मानाबाद) : तालुक्‍यातील त्रिकोळी येथील जिल्हा परिषद शाळेत पोषण आहाराच्या माध्यान्ह भोजनातील भातामध्ये पाल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी (ता. 24) दुपारनंतर एका विद्यार्थिनीच्या डब्यातील भातात पाल दिसून आल्याने पालकांनी गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांना चांगलेच धारेवर धरले. बुधवारी (ता. 25) सकाळी शालेय पोषण आहार अधीक्षक व्ही. जी. राठोड व विस्तार अधिकारी शिवकुमार बिराजदार यांनी शाळेत येऊन पंचनामा केला. दरम्यान, सुदैवाने विद्यार्थ्यांना विषबाधा झाली नाही. मात्र मुख्याध्यापक, शिक्षक व पोषण आहार तयार करणाऱ्या व्यक्तींच्या दुर्लक्षामुळे हा गंभीर प्रकार घडल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते.

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पटसंख्या 264 आहे. मंगळवारी विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिले गेले. चौथीतील तृप्ती किशोर वाडीकर हिने डब्यात भात घेतला होता. शाळा सुटल्यानंतर ती भाताचा डबा घरी घेऊन गेली. घरी गेल्यानंतर डबा उघडला असता पाल आढळून आली. पालकांनी तत्काळ मुख्याध्यापक पद्माकर पाटील, शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष विकास पाटील यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली.

बुधवारी शालेय पोषण आहार अधीक्षक व श्री. राठोड व विस्तार अधिकारी शिवकुमार बिराजदार यांनी शाळेत येऊन पंचनामा केला. विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ होणाऱ्या गंभीर प्रकरणाचा जाब ग्रामस्थांनी अधिकारी, मुख्याध्यापकांना विचारत पालकांनी शाळेत ठिय्या मांडला होता. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष विकास पाटील, सरपंच रवींद्र हंगरगे, सेवा संस्थेचे अध्यक्ष भीमराव पाटील, प्रवीण जाधव, शिवाजी सुरवसे, गोरख तेलंग, हरिदास सुरवसे, प्रभाकर बिराजदार, विठ्ठल कुर्लेकर, सुग्रीव वाडीकर, संतराम काळे, शिवाजी बिराजदार, गणपती मिरगाळे, विष्णू बिराजदार यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेतील अनेक समस्यांकडे मुख्याध्यापकांचे दुर्लक्ष होत असल्याने पालकांनी त्यांच्या बदलीची लेखी मागणी अधिकाऱ्यांकडे केली. दरम्यान, ग्रामस्थ, पालकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांची चौकशी सुरू केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parents' protest in the Tringoli School