दुकानासमोर वाहने; पैसा मात्र बाजार समितीच्या खिशात

प्रकाश बनकर
रविवार, 22 सप्टेंबर 2019

बाजार समिती नुसते पैसे कमविण्याच्या मागे लागली असून व्यापाऱ्यांना सुविधा देण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीमंडईत येणाऱ्या शेतकरी आणि ग्राहकांसाठी बाजार समितीतर्फे ठेकेदाराच्या माध्यमातून "पे ऍण्ड पार्क'ची सुविधा देण्यात आली आहे. ही सुविधा देताना पार्किंगसाठी जागा देण्यात आलेली नाही. यामुळे ही पार्किंग थेट खत-बियाणे विक्रेत्यांच्या दुकानासमोर करण्यात येत आहे. या पार्किंगमुळे दुकानदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

बाजार समिती नुसते पैसे कमविण्याच्या मागे लागली असून व्यापाऱ्यांना सुविधा देण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. बाजार समितीने 80 कोटींची विकासकामे करण्यात येत असल्याचा दावा संचालक मंडळातर्फे केला जात आहे. कोट्यवधी रुपयांची कामे करताना छोटा विषय असलेल्या पार्किंगकडे सपशेल दुर्लक्ष केले जात आहेत.

खते-विक्रेत्यांच्या जागेवर ठेकेदार आणि बाजार समिती बक्‍कळ पैसे कमवीत आहे. हा प्रकार थांबवीत भाजीमंडई आणि अडत्यांकडे येणाऱ्यांसाठी स्वतंत्र पार्किंग उभारण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parking Problems in Market Committee