परळीत मुसळधार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

परळी वैजनाथ - परळी शहर व परिसरात बुधवारी (ता. सात) पहाटे मेघगर्जना व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. दमदार पावसाने पावसाळ्याची सुरवात झाल्याने शेतकरीवर्गात उत्साहाचे वातावरण आहे. या पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात थंडावा निर्माण झाल्याने सर्वसामान्य सुखावले आहेत. 

जून महिना सुरू झाल्यानंतर दोनदा पावसाने तालुक्‍यात हजेरी लावली. बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास परळीत पावसाला सुरवात झाली. तीनच्या नंतर मुसळधार पाऊस झाला. मेघगर्जना व विजेच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे शहर व परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक घरांवरील छपरे उडाली. झाडाच्या फांद्या तुटल्या, काही ठिकाणी विजेच्या ताराही तुटल्या. सकाळपर्यंत पावसाची रिपरीप सुरू होती. या पावसाने शहर व परिसरातील नद्या, नाल्यांतून पाणी वाहू लागले. सकल भागांतही पाणी साचले. दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला असून खरिपाच्या पेरणीच्या तयारीला तो लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाड्यामुळे हैराण झालेले सर्वसामान्य या जोरदार पावसामुळे सुखावले आहेत. या पावसाने वातावरणात थंडावा निर्माण केला आहे. बुधवारी पहाटे दोन ते सकाळी सातपर्यंत सुमारे ६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तालुक्‍यातील सिरसाळा सर्कलमध्ये २०, गाढेपिंपळगाव सर्कलमध्ये २२, नागापूर सर्कलमध्ये ४० व धर्मापुरी सर्कलमध्ये ४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: parli vaijnath news rain marathwada