शेतमाल उपाययोजना समितीवर पाशा पटेल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

लातूर - नाशवंत शेतमालाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळण्याच्या दृष्टीने शासनास उपाययोजना सुचविण्यासाठी शासनाने समिती गठित केली असून या समितीवर शेतकरी नेते व माजी आमदार पाशा पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. 

लातूर - नाशवंत शेतमालाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळण्याच्या दृष्टीने शासनास उपाययोजना सुचविण्यासाठी शासनाने समिती गठित केली असून या समितीवर शेतकरी नेते व माजी आमदार पाशा पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. 

राज्यात फळे व भाजीपाला पिकाखाली अनुक्रमे 7.42 लाख हेक्‍टर व 6.92 लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. राज्यातील फळे व भाजीपाल्याचे उत्पादन अनुक्रमे 108 लाख मेट्रिक टन व 115 लाख मेट्रिक टन एवढे आहे. नाशवंत शेतमालाची शास्त्रोक्तपद्धतीने काढणी, काढणीपश्‍चात हाताळणी, शहरी भागात नाशवंत शेतमालाच्या विक्री व्यवस्थेचा अभाव, विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची मोठी साखळी, शीतगृहांचा व शीत साखळीचा अभाव इत्यादी कारणांमुळे एकूण उत्पादनापैकी 25 ते 30 टक्के मालाची नासाडी होते. त्यामुळे याचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी ही समिती गठित करण्यात आली आहे. 

या समितीचे अध्यक्ष कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक हे आहेत. या समितीवर शेतकरीनेते व माजी आमदार पाशा पटेल यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. समितीत फलोत्पादन संचालक, अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे, नाशिकच्या सह्याद्री ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे विलास शिंदे, पुण्याच्या महाग्रेप्सचे अध्यक्ष सोपान कांचन, पुण्याच्या महाआनारचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, नागपूरच्या महाऑरेंजचे अध्यक्ष श्रीधर ठाकरे, अंधेरीच्या आयएनआय फॉर्म्सचे पंकज खंडेलवाल, मंगळवेढ्याचे शेतकरी अंकुश पडवळे हे सदस्य आहेत. सदस्य सचिव कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक आहेत. 

Web Title: Pasha Patel on the Commodity Reform Committee