औरंगाबादमधून अशी पसरली मराठवाड्यात शिवसेना

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद : जनतेच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे, दंगलीत समोरासमोर उभे राहणारे, पोलिसांच्या काठ्या अंगावर झेलत हिंदूंचे रक्षण करणारे शिवसेना कार्यकर्ते घडले ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावशाली वक्‍तृत्वाने अन्‌ प्रखर विचारांनी. शिवसेनाप्रमुखांचे गारूड मराठी माणूस व हिंदू जनतेच्या मनावर झाले. शिवसेनेचे लोण मुंबई, ठाण्यानंतर ऐतिहासिक औरंगाबादमधून संपूर्ण मराठवाड्यात पोचले. 

मराठवाड्यात आज गावागावांत शिवसेनाप्रमुखांच्या विचारांनी भारावलेली मंडळी आहेत. शिवसेनेच्या शाखा आहेत. अडचणीच्या वेळेस मदतीला धावून जाणारे शिवसेनेचे कार्यकर्ते पाहायला मिळतात. मराठवाड्यातील शिवसेनेची सुरवात झाली ती औरंगाबाद शहराच्या गुलमंडी येथून.

आठ जून 1985 रोजी तरुणांनी एकत्र येऊन गुलमंडीवर शिवसेनेची पहिली पाटी रोवली. जय भवानी, जय शिवाजी म्हणत वाटचाल सुरू झाली. मुंबई, ठाण्यात घुमणारी शिवसेनेच्या वाघाची डरकाळी औरंगाबादेत ऐकायला यायला लागली. गुलमंडीवर सुरू झालेल्या शाखेला चांगला प्रतिसाद मिळाला.

बाळासाहेबांच्या विचाराने भारावलेल्या तरुणांची फौज शिवसेनेत दाखल व्हायला लागली तसा संघटनेचा विस्तार झाला. गुलमंडीनंतर पदमपुरा, हमालवाडा करत करत शहराच्या अनेक भागांत शिवसेनेचा भगवा झेंडा आणि पाटी झळकली. गावागावांतून लोक आमच्या गावात शाखा स्थापन करा म्हणत शिवसैनिकांना स्वखर्चाने घेऊन जायचे. 85 ते 90 हा पाच वर्षांचा काळ शिवसेना शहराप्रमाणेच खेड्यापाड्यात पोचण्याचा होता. 

हिंदूंचे रक्षण हा मुख्य अजेंडा घेऊन मैदानात उतरलेल्या शिवसेनेने 17 जानेवारी 1986 ला पहिला मोर्चा शहरातून काढला. काळे धंदे बंद करा, मुस्लिमांची गुंडगिरी रोखा, सिल्लेखाना शहरातून हद्दपार करा आणि समान नागरी कायदा लागू करा या मागण्यांसाठीचा हा मोर्चा होता. क्रांती चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असतानाच सिटी चौकात मोर्चावर दगडफेक झाली. दगडाला दगडाने उत्तर दिले आणि जातीय दंगलीचा भडका उडाला. शिवसेनाच आमची रक्षणकर्ती हा विश्‍वास शहरवासीयांना देण्यात संघटना यशस्वी ठरली.

राजकीय सुरवात

1988 च्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना राजकारणात उतरली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मराठवाड्यातली पहिली सभा झाली. त्यावेळी प्रथमच शिवसेनेचे तब्बल 27 नगरसेवक निवडून आले. औरंगाबादच्या राजकीय इतिहासात चमत्कार घडवला तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी.

नंतरच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेवर व शिवसेनाप्रमुखांवर येथील मतदारांनी भरभरून प्रेम केले. याबद्दल मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील विजयी सभेत त्यांनी लाखोंच्या समुदायाला साष्टांग दंडवत घालून कृतज्ञता व्यक्त केल्याची आठवण अनेक जुने शिवसैनिक आजही सांगतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com