मराठवाड्यातील आणखी तीन जिल्ह्यांत पासपोर्ट कार्यालय

Passport
Passport

लातूर - मराठवाड्यात आतापर्यंत पाच जिल्ह्यांत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाले असून, उर्वरित उस्मानाबाद, हिंगोली, परभणी या तीन जिल्ह्यांतही पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याबाबतची कार्यवाही सरकार पातळीवर चालू झाली आहे.

नव्या वर्षाच्या सुरवातीला हे तिन्ही कार्यालये सुरू होतील. त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांना पासपोर्टसाठी दुसऱ्या जिल्ह्यांत वारंवार चकरा मारण्याची गरज पडणार नाही. शिवाय, नागरिकांचा वेळ आणि पैसाही वाचणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने घेतला आहे. त्यासाठी ठिकठिकाणच्या टपाल खात्याची मदत घेतली जात आहे. लातूरमध्ये टपाल खात्याच्या इमारतीत पासपोर्ट सेवा केंद्र नुकतेच सुरू करण्यात आले. यानिमित्ताने डाकसेवेच्या औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालयाचे निदेशक श्री. बी. अरुमुगम यांनी नुकतीच लातूरमधील कार्यालयाला भेट दिली. यावेळी ‘सकाळ’शी बोलताना ते म्हणाले की, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी या तीन जिल्ह्यांतही लवकरच पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होतील. त्यासाठी टपाल विभागाने पासपोर्ट कार्यालयासाठी जागा दिली आहे. त्याबाबतची कार्यवाही पूर्ण झाली आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, लातूर या जिल्ह्यांत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाले आहेत. याआधी नागरिकांना पुणे, मुंबई, नागपूर या शहरांत पासपोर्ट काढण्यासाठी जावे लागत होते. आपापल्या जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र उपलब्ध झाल्याने वाढीव खर्चाबरोबरच नागरिकांच्या वेळेचीही बचत होत आहे.

धुळे, भुसावळचाही लवकरच क्रमांक
डाकसेवेच्या औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालयात येणाऱ्या भुसावळ आणि धुळे शहरांतही पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे येथेही नव्या वर्षात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्याचे पाहायला मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com