बेवारस रूग्णांना आणून टाकले रस्त्यावर ; शासकिय रूग्णालयातील धक्कादायक प्रकार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

आता तर रुग्णालय प्रशासनाने कहर केलाय. दोन दिवसांपूर्वी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना बाहेर नेऊन रस्त्यावर सोडण्याचा नवा पायंडा सुरू झाला आहे. एका अपघातात रस्ता ओलांडत असताना दोन बेवारस वृध्द व्यक्तींच्या पायाला मार लागला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होता.

नांदेड : शहरापासून काही अंतरावर विष्णुपुरी येथे असलेल्या शासकिय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बेवारस रुग्णांना चक्क एका कोंबून शहराच्या बंदाघाट रस्त्यावर सोडले. या दोन्ही रूग्णांच्या पायाला अपघाता मार लागल्याने ते उपचार घेत होते. यातील एका रुग्णाचा रविवारी (ता. २९) सकाळी मृत्यू झाला. या घटनेमुळे रूग्णालय प्रशासनाविरूध्द संताप व्यक्त होत आहे.

येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेले शासकिय वैद्यकिय महाविद्यालय आणि रूग्णालय हे मागील दोन वर्षापासून विष्णुपूरी परिसरात स्थलांतरीत झाले. परंतु तेव्हापासून रुग्णालय प्रशासन नेहमीच या- ना त्या कारणावरून चर्चेत असते. येथील कर्मचाऱ्यांकडून व सुरक्षा रक्षकांकडून रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना नेहमीच अपमानास्पद वागणुक मिळते. तसेच शिकाऊ डॉक्टरांकडून रुग्णांना चीडचीड केल्या जाते.

आता तर रुग्णालय प्रशासनाने कहर केलाय. दोन दिवसांपूर्वी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना बाहेर नेऊन रस्त्यावर सोडण्याचा नवा पायंडा सुरू झाला आहे. एका अपघातात रस्ता ओलांडत असताना दोन बेवारस वृध्द व्यक्तींच्या पायाला मार लागला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होता. त्यांच्या पायाला प्लास्टर करून काही दिवस उपचार करून त्यांना एका बंदाघाट रस्त्यावर आणून सोडले. 

प्रचंड तापमानात आजाराने विव्हळत यातील एकाचा फुटपाथवरच मृत्यू झाला. तर पूर्णा तालुक्यातील मोते धानोरा येथील भगवान लक्ष्मण खंदारे हा पायाच्या दुखापतीने त्रस्त आहे. रूग्णालयाची माया आटली की काय असा प्रश्‍न उपस्थित करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी, यासाठी अधिष्ठाता यांची भेट घेणार असल्याचे टायगर सेनेचे बाळू जाधव यांनी सांगितले.

वजिराबाद पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून जखमीला पुन्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: Patients Discharged from Hospital Situation of Government Hospital