दसरा मेळाव्यासाठी सावरगावात तयारी सुरू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

पाटोदा (जि. बीड) - गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या भगवानगडावरील दसरा मेळाव्याच्या वादाला पूर्णविराम देत अखेर पाटोदा तालुक्‍यातील सावरगाव येथे हा मेळावा होणार हे निश्‍चित झाले आहे. संत भगवानबाबांची जन्मभूमी असलेल्या ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी (ता. 30) होणाऱ्या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. मेळाव्यानिमित्त खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गोपीनाथगड ते सावरगाव अशी रथयात्रा काढली जाणार आहे.

भगवान गडावरील मेळाव्यावरून मागील पंधरा दिवस गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्रींचे समर्थक आणि पालकमंत्री पंकजा मुंडे समर्थकांमध्ये वाद सुरू होता. यावरून आरोप - प्रत्यारोपांच्या फैरीही झाडल्या जात होत्या. मात्र, भाषणामुळे वाद होण्याचा मुद्दा पुढे करत महतांनी अखेर मेळावा नाहीच, अशी भूमिका घेतली. पंकजा यांनी केलेल्या भावनिक आवाहनालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मागील वर्षीप्रमाणे भगवान गडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घेण्यासही नगर जिल्हा प्रशासनाने नकार दिल्यानंतर पंकजा या दसरा मेळावा कोठे घेणार, याची चर्चा सुरू होती.

अखेर, भगवान बाबांची जन्मभूमी असलेल्या सारगाव घाट येथे मेळावा घेण्याचे पंकजा यांनी गुरुवारी जाहीर केले. "कर्मभूमी नाही तर जन्मभूमी बोलावतेय, जन्मस्थळाची माती कपाळी लावून नवीन अध्याय सुरू करते' असे ट्‌विट करत पंकडा यांनी समर्थकांना साद घातली. त्यानंतर या ठिकाणी मेळाव्याची तयारी सुरू झाली आहे. मेळाव्यासाठी मैदान तयार करण्याचे काम आज सुरू होते. ग्रामस्थांनी या संपूर्ण परिसराची साफ सफाई केली.

दरम्यान, अनेक वर्षांपासून भगवान गडावर होणाऱ्या मेळाव्याबाबत होणारा वाद टाळण्यासाठी सावरगाव घाट येथे मेळावा घेण्याबाबत आम्हीच पंकजा यांना विनंतीवजा आग्रह केला. पुढच्या काळात याच ठिकाणी विचारांचे सोने लुटले जाईल, असे विजय गोल्हार म्हणाले.

Web Title: patoda beed news dasara campaign in savargaon