गादी, उशी, सतरंजी, चादर, घोंगडी अन्‌ बरंच काही... 

मधुकर कांबळे
सोमवार, 23 डिसेंबर 2019

मेंढ्यांच्या मागे फिरताना बगलेत लोकर भरलेली पिशवी, तर हातात चरखा घेऊन लोकरीचे सूत कातत फिरणारे मेंढपाळ आता कमी झाले आहेत. आता सूत कातण्यासाठी चरख्याचा वापर केला जात आहे. पडेगाव येथील शेळी-मेंढी विकास प्रक्षेत्रात चरख्यावर सूत कातून त्यापासून लोकरीपासून वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या जात आहेत.

औरंगाबाद : रेशमी, मुलायम किमती कपड्यांइतकेच मेंढीच्या लोकरीपासून तयार केलेल्या पारंपरिक वापरातल्या घोंगडी, सतरंजी, गाद्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. आता लोकांना मेंढीच्या लोकरीपासून तयार केलेल्या या वस्तूंचे महत्त्व लक्षात येत आहे. त्यामुळे शहरी भागातील लोकांचा ओढा वाढत आहे. एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळत असल्याने हा ओढा वाढलाय. या वस्तू मिळतात पडेगाव येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास प्रक्षेत्रात. 

मेंढीच्या लोकरीपासून हातमागावर या वस्तू तयार केल्या जातात. यासाठी खासगी मेंढपाळांकडून 50 ते 60 रुपये किलो दराने लोकर खरेदी केली जाते. शेतीला पूरक शेळीपालनाचा व्यवसाय करता यावा यासाठी शेळी-मेंढीपालनाचे प्रशिक्षणही या संस्थेतून दिले जात असून, दरवर्षी सुमारे 1200 जण शेळी-मेंढीपालनाचे प्रशिक्षण घेत असल्याचे सहायक पशुधन विकास अधिकारी के. एम. गिलबिले यांनी सांगितले. 

हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना

मेंढ्यांच्या मागे फिरताना बगलेत लोकर भरलेली पिशवी, तर हातात चरखा घेऊन लोकरीचे सूत कातत फिरणारे मेंढपाळ आता कमी झाले आहेत. आता सूत कातण्यासाठी चरख्याचा वापर केला जात आहे. पडेगाव येथील शेळी-मेंढी विकास प्रक्षेत्रात चरख्यावर सूत कातून त्यापासून लोकरीपासून वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या जात आहेत. विणकामाचे प्रशिक्षण देऊन इतर मेंढपाळांना प्रशिक्षित करण्याबरोबरच या ठिकाणीही लोकरीपासून वस्तू तयार केल्या जातात.

क्‍लिक करा : माझ्या पप्पाचा पगार वाढवा ना, चिमुकलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र   

झोपण्यासाठी आणि अंथरण्यासाठी जीन, लोकरीची गादी, उशी, सतरंजी, चादर, घोंगडी, चेअर कार्पेट, पूजेचे आसन, जेवायला बसण्यासाठी पट्ट्या लोकरीपासून हातमागावर विणल्या जातात. लोकरीची चादर साधारणत: 900 रुपयांना, तर घोंगडी 1 हजार आणि त्यापुढे तर लोकरीची गादी 1 हजार ते 3 हजार रुपयांपर्यंत इथे मिळते.

लोकरीच्या वस्तू वापरण्याचे फायदे

श्री. गिलबिले यांनी सांगितले, की लोकरीच्या कपड्यांवर बसल्याने, झोपल्याने पित्ताचा त्रास कमी होतो. कितीही कडाक्‍याची थंडी असली तरी ती जाणवत नाही. संधिवात, पाठदुखी कमी होते. स्पॉंडिलेसिस कमी होतो. लोकरीचे कपडे मातीत जरी अंथरले तरी ते मळत नाहीत. त्यांना झटकले की ते साफ होतात. नीट वापर केला तर लोकरीचे कपडे पाच वर्षे टिकतात, तर घोंगडी दहा वर्षांपर्यंत टिकते. लोकरीच्या वस्तूंचा जेवढा जास्त वापर तेवढी जास्त दिवस ती टिकते. ही गोष्ट आता शहरी भागातील लोकांच्या लक्षात आल्याने शहरी भागातील लोक खरेदीसाठी अधिक येतात. शिवाय एकाच ठिकाणी हातमागावर तयार केलेले कपडे मिळतात, हेही एक कारण आहे.

हेही वाचा : video - मनुष्यालाच नव्हे तर चक्क कुत्रे, मांजरांनाही होतो मधुमेह

सध्या या प्रक्षेत्रात 300 मेंढ्या आहेत. एका मेंढीपासून 800 ते 900 ग्रॅम तर जास्तीत जास्त दीड किलोपर्यंत लोकर मिळते. उन्हाळ्यात आणि हिवाळा सुरू होण्यापूर्वी दोनवेळा लोकर काढण्यात येते. लोकरीच्या वस्तूंची मागणी जास्त आहे; मात्र प्रक्षेत्रातील मेंढ्यांपासून मिळणारी लोकर पुरेशी होत नसल्याने खासगी मेंढपाळांकडून 50 ते 60 रुपये किलो दराने लोकर विकत घेतली जाते. मराठवाड्यात दख्खनी मेंढ्या जास्त पाळल्या जातात. यांच्यापासून जास्त लोकर मिळत असल्याचे श्री. गिलबिले म्हणाले.

शेतीपूरक व्यवसाय

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास प्रक्षेत्रात शेतीला शेळीपालनाची जोड देऊ इच्छिणाऱ्यांसाठी किंवा स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांना तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येते. यासाठी शिक्षणाची अट नाही. एका बॅचमध्ये 100 प्रशिक्षणार्थी असतात. सरासरी वर्षाला 1200 लोकांना या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते. या तीन दिवसांच्या प्रशिक्षणात शेळ्यांचे संगोपन, शेड, लसीकरण, चारानिर्मिती व चारा व्यवस्थापन, जंतनाशक औषधी कशी द्यावी, कोणते आजार होतात व काय काळजी घ्यावी आदींविषयी मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे सहायक पशुधन विकास अधिकारी श्री. गिलबिले यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People Attracting Towards Woolen Market