औरंगाबाद: पाण्याच्या टाकीवर चढून नागरिकांचे आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

गेल्या सहा दिवसांपासून या भागात नळाला पाणी आलेले नाही. तसेच रात्री बारानंतर पाणी दिले जाते, असा आरोप करत महिला व पुरुष पाण्याच्या टाकीवर चढले. महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या वेळी करण्यात आली.

औरंगाबाद : पाण्यासाठी नागरिकांचा आक्रोश सुरूच असून, सोमवारी (ता. सात) भवानीनगर वॉर्डातील महिला, पुरुषांनी क्रांती चौक वॉर्ड कार्यालयाशेजारील पाण्याच्या टाकीवर चढून जोरदार आंदोलन केले. हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, महापालिकेचे करायचे काय... अशा जोरदार घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. 

शहरातील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक गेल्या दोन महिन्यांपासून कोलमडले आहे. दोन दिवसाआड पाणी देण्याचा दावा प्रशासन करत असले तरी प्रत्यक्षात चार-पाच दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यामुळे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. गुलमोहर कॉलनी, मथुरानगर येथील नागरिकांनी सिडको एन-पाच येथील पाण्याच्या टाकीवर दोन दिवस आंदोलन केले होते. त्यानंतर सोमवारी दादा कॉलनी, दत्तनगर न्यू संजयनगर येथील नागरिकांनी सकाळीच क्रांती चौकातल्या पाण्याच्या टाकीवर धाव घेतली.

गेल्या सहा दिवसांपासून या भागात नळाला पाणी आलेले नाही. तसेच रात्री बारानंतर पाणी दिले जाते, असा आरोप करत महिला व पुरुष पाण्याच्या टाकीवर चढले. महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या वेळी करण्यात आली. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली मात्र त्यांचे समाधान झाले नाही.

Web Title: peoples agitation for water in Aurangabad