स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी नागरिकांची खंडपीठात धाव 

सुषेन जाधव 
रविवार, 29 जुलै 2018

स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. सुनावणीदरम्यान न्यायमुर्ती आर. एम. बोर्डे व न्यायमुर्ती ए. एम. ढवळे यांच्या पीठाने शासनाला नोटीस बजावली. प्रकरणात 1 ऑगस्ट ला पुढील सुनावणी होईल. 
 

औरंगाबाद - पारोळा तालुक्‍यातील हिवरखेडा सिमतांडा (जि. जळगाव) येथील नागरिकांनी स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. सुनावणीदरम्यान न्यायमुर्ती आर. एम. बोर्डे व न्यायमुर्ती ए. एम. ढवळे यांच्या खंडपीठाने शासनाला नोटीस बजावली. प्रकरणात 1 ऑगस्टला पुढील सुनावणी होईल. 

हिवरखेडा सिमा तांडा येथील शालीकराम मंगू पवार यांनी सदर याचिका दाखल केली आहे. त्यानुसार 12 फेब्रुवारी 2014 ला ग्रामविकास व जलसंधारण विभागाने बंजारा समाजाच्या तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गावकऱ्यांनी शासन दरबारी स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी अनेकदा निवेदन दिले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शासनाने अद्यापही नवीन ग्रामपंचायतीचा अध्यादेश जारी न केल्याने त्यांनी अॅड. अभय राठोड यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यांची वस्ती ही मुख्य ग्रामपंचायत मोंढाळे पासून 4 किलोमीटर अंतरावर असून दुर्गम भागामध्ये आहे. त्यामुळे स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी शासनाला आदेश द्यावेत अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

Web Title: Peoples demand for Independent Gram Panchayat Parola Taluka