शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे वैयक्‍तिक कारणे; भाजप आमदाराचा अजब दावा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

शेतकऱ्यांच्या आत्महत्या या पुर्वीपासून होत त्या आजच होत आहेत का? असा उलट प्रश्‍न औरंगाबादचे आमदार अतुल सावे यांनी उपस्थिती केला आहे. 

औरंगाबाद - राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत. रोज एक शेतकरी आपले जीवन संपवत आहे. या आत्महत्या मागे वैयक्‍तिक कारणे असल्याचे सांगत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या पुर्वीपासून होत त्या आजच होत आहेत का? असा उलट प्रश्‍न औरंगाबादचे आमदार अतुल सावे यांनी उपस्थिती केला आहे. 

निवडणूका जवळ येत असल्यामुळे भाजपतर्फे विविध आघाडीतील नियुक्‍त्या करण्यात येत आहे. सोमवारी (ता. 7) भाजप व्यापारी आघाडीच्या पदाधिकारी नियुक्‍तीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बोलतांना आमदार सावे यांनी हा दावा केला आहे. खते बी-बियाणे, महागा झाली यातच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. अशा परिस्थिती शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार काय उपाय योजना करते असे आमदार सावे यांना विचारण्यात आले. त्यावर आमदार सावे एकदम भडकले. जीएसटी येण्यापुर्वी शेतकऱ्यांना लागणाऱ्या साहित्यावर कर लागत नव्हता का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या बी-बियाणे, खत न मिळाल्यामूळे होत नाही. त्यांची कारणं वेगळी असतात, कुणी वैयक्‍तिक कर्ज घेतात तर कुणाचा लग्नाचा प्रश्‍न असतो. अशा वैयक्‍तिक स्वरुपाची कारणे असतात. या आत्महत्या पुर्वीपासून होत आहेत. असे सांगत पत्रकार परिषद संपवली. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, कामगार मोर्चाचे संजय केणेकर, व्यापारी आघाडीचे मनोज चोपडा, नगरसेवक कचरु घोडके, नगरसेवक रामेश्‍वर भादवे, राम बुधवंत मोहन आहेर उपस्थित होते. 

भाजपकडून लोकसभेसाठी मीच इच्छुक 
भाजपतर्फे राज्यात लोकसभेसाठी 48 मतदार संघात तयारी करण्यात आली आहे.तर औरंगाबादेतून कोण इच्छिुक आहे असे पत्रकारांनी विचारल्यानंतर मी स्वत लोकसभेसाठी इच्छुक आहे. दुसरे कोण इच्छुक आहे हे मला माहिती नाही असे भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. पक्षाने उमेदवार घोषित केला नसला तरी कराड यांनी मात्र आतापासूनच आपण उमेदवार असल्याचे यावेळी घोषित केले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Personal reasons for farmers suicides said MLA Atul Save