अट्टल चोरांनाही न जमावी अशी चोरी

मनोज साखरे
मंगळवार, 9 जुलै 2019

म्हणे, माझीही फसवणूक झाली...!
‘‘मला वाटले तो विश्‍वासू असेल म्हणून मी राजेंद्र जैनवर विश्‍वास ठेवला. पण त्यानेही दगा दिला. मी फसलो गेलो,’’ अशी उपरती आर्थिक गुन्हे शाखेने मुसक्‍या आवळलेला वामन हरी पेठेचा व्यवस्थापक अंकुर राणेला झाली.

औरंगाबाद - चोर, दरोडेखोर असो की, बॅंक लुटणारी टोळी, दोन वर्षांत एवढी अमाप माया तेही कमावणार नाहीत. पेठे ज्वेलर्स प्रकरणात मात्र चक्क पासष्ट किलोपर्यंत सोन्याचे दागिने चोरून संशयितांनी सुमारे ३० कोटींची माया दोनच वर्षांत मिळविली. एका अर्थाने ते अट्टल चोरांचेही ‘गुरू’ निघाले! 
पंधरा वर्षांपासून वामन हरी पेठेंसोबत संशयित अंकुर राणे काम करतो.

मालकाचा त्याने चांगलाच विश्‍वास संपादन केला होता. त्यामुळेच त्याला औरंगाबादेत नऊ वर्षांपूर्वी समर्थनगर येथे सुरू झालेल्या शाखेत व्यवस्थापकपदी बसविले गेले. परंतु पेठेंचा सुवर्ण‘खजिना’ त्याला खुणावत होता. त्याची नियतही फिरली. त्यासाठी राजेंद्र जैन हा ‘कारनामेबाज’ कारण ठरला. नाशिक, धुळ्यात ‘हेराफेरी उद्योग’ केल्यानंतर त्याने औरंगाबादेत जम बसविण्याचे प्रयत्न केले. त्यासाठी वामन हरी पेठेंचे सुवर्णद्वार मनात भिनले अन्‌ तेथूनच सुरू झाला चोरीचा ‘गृहप्रवेश’. आईसाठी मंगळसूत्र व दहा ग्रॅम सोने खरेदीचे निमित्त करून तो सुवर्णपेढीत घुसला अन्‌ बाहेर निघाला ते सुमारे पासष्ट किलो सोने घेऊनच. यासाठी त्याने व्यवस्थापक राणेला भुलविले. त्याला जाळ्यात ओढले. राणेला ‘धंद्याची’ क्‍लृप्ती सांगून त्याने ‘पेठे’तील सोने व त्यावरील २५ टक्के कमिशनची वाट दाखविली.

कमिशनच्या झळाळीने त्याचे डोळे दिपले आणि त्याने लालसेपोटी मालकाला दगा दिला. पण हाती बेड्या पडल्यानंतर अंकुरला पश्‍चात्तापाचे उमाळे फुटू लागले. जैनने माझाही विश्‍वासघात केला. नको त्या कारनाम्यात पडलो, अशी बाब त्याने बोलून दाखविल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

चौकस बुद्धी तारण
चोरीचे कोट्यवधींचे सोने, दागिने गहाण म्हणून स्वत:च्या संस्थेत ठेवताना फायनान्स कंपन्या, सराफा व्यापाऱ्यांनी चौकस बुद्धी जाणीवपूर्वकच तारण ठेवली. लालसा आणि अमाप नफ्यासाठी त्यांनी हा ‘उद्योग’ केला. अशा संस्था आता पोलिसांच्या रडारवर असून त्यांच्याकडेही चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

साधारणतः कोणाची ‘मिळकत’ किती?
मंगळसूत्र चोर    :    आठवड्यातून ३-४ तोळे.
अट्टल घरफोड्या    :    दीड ते चार लाख आठवड्यात, महिन्यात 
दरोडेखोर    :    महिना-दोन महिन्याला चार ते आठ लाख रुपये.
बॅग लिफ्टर    :    महिन्यात आठ ते दहा लाख.
थापाडे, भामटे    :    महिन्यात दोन लाखांपर्यंत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pethe Jewellers Theft Crime ankur rane