नगरसेवकाला अपात्र ठरविण्यासाठी खंडपीठात धाव

​ ​​​सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

  • सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याचे प्रकरण
  • तीन महिन्यांत निर्णय घेणार : महापालिका 
  • आयुक्तांनाही निवेदन देण्यात आले
  • महापालिकेच्या वतीने अॅड. संभाजी टोपे यांनी केला युक्तीवाद

औरंगाबाद : सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी नगरसेवक मकरंद कुलकर्णी यांना अपात्र ठरविण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेच्या सुनावणीदरम्यान, या प्रकरणात तीन महिन्यांत निर्णय घेण्यात येईल, असे निवेदन महापालिकेच्या वतीने करण्यात आले. ते निवेदन स्वीकारून न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. अविनाश घारोटे यांनी याचिका निकाली काढली. 

 

यासंदर्भात पीपल्स फोरम फॉर सोशल कॉज या संस्थेचे सचिव राजेंद्र दाते पाटील यांनी ऍड. मधुर गोलेगावकर यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली होती. याचिकेत म्हटल्यानुसार, शहर परिसरातील एन-आठ येथील शिवदत्त हौसिंग सोसायटी येथे 130.5 चौरस मीटर जागेवर नगरसेवक मकरंद कुलकर्णी यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. सदर निवासी व व्यावसायिक बांधकाम हे बेकायदा असून, महापालिका अधिनियमातील कलम 10 (1) मधील तरतुदीनुसार कुलकर्णी यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली होती.

उघडून तर पाहा - औरंगाबाद : रुग्णांना घरपोच मोफत रिक्षा, या क्रमांकावर करा काॅल

यासंदर्भात महापालिका आयुक्तांनाही निवेदन देण्यात आले होते; परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असे सुनावणीवेळी खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी महापालिकेच्या वतीने अॅड. संभाजी टोपे यांनी निवेदन केले, की या संदर्भात तीन महिन्यांत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. हे निवेदन स्वीकारून खंडपीठाने याचिका निकाली काढली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petition filed against Corporator Eligibility