पेट्रोलपंप चालकांची न्यायालयात धाव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

औरंगाबाद - फायर एनओसीवरून महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईविरोधात पेट्रोलपंप चालकांनी न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता.पाच) परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर पंपचालकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या सदस्यांसह शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे बुधवारी (ता. सात) केंद्रीय पेट्रोलियम मंत्री व सचिवांना भेटणार आहेत.
न्यायालयाच्या आदेशाने अग्निशामक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी कागदपत्रे दाखल न केल्यास 23 पेट्रोलपंपांना सील ठोकण्याची कारवाई सध्या स्थगित केली आहे.

महापालिका आयुक्तांनी शहरातील पेट्रोलपंप चालकांविरुध्द कारवाईचा बडगा उगारलेला असून पंपचालकांनी तत्काळ फायर एनओसी घेण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. तसेच रेल्वेस्टेशन, शहागंज, जाफरगेट आदी ठिकाणच्या पेट्रोलपंपांना 48 तासात फायर एनओसी घेण्याच्या नोटिसा बजावल्या. या नोटिसा मिळाल्यानंतर एन. ए. प्रिंटर, अशोक ब्रदर्स आणि ए. पी. पटेल यांनी ऍड. योगेश थोरात यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली व या नोटिसा बेकायदेशीर असून त्यांना अशा नोटिसा देण्याचा अधिकार नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. तसेच शहरातील सर्व पेट्रोलपंपांना केंद्र सरकारच्या पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा संघटन (पेसो) यांचे अग्निशामक प्रमाणपत्र आहे आणि तेवढेच पुरेसे आहे अशी भूमिकाही मांडली. महापालिकेतर्फे ऍड. जयंत वासडीकर न्यायालयात हजर झाले. याप्रकरणी न्यायालयाने सोमवारी (ता.पाच) तारीख दिली असून सोमवारपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

महापालिकेतर्फे सांगण्यात आले की, सोमवारपर्यंत पंपचालकांविरुध्द कारवाई केली जाणार नाही.

पंपचालकांनी खासदार खैरे यांची भेट घेतली. खासदार खैरे यांनी आयुक्तांशी चर्चा केली. त्यानंतर उपायुक्त रवींद्र निकम यांच्याशीही चर्चा केली. संबंधित पंपचालकांनी मालमत्ता कराचा भरणा करावा, त्यासाठी लवकरच बैठक घेण्याची तयारी आयुक्तांनी दर्शवली. पंपमालक असलेल्या पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी पंपांबाबतचे कर भरल्याचे स्पष्ट केले. खासदार खैरे यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी बुधवारी (ता. सात) पंपचालकांना घेऊन दिल्ली येथे केंद्रीय मंत्री आणि केंद्रीय सचिवांना भेटण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रातील पंपचालकांनी मालमत्ता कर व पाणीपट्टी भरून अग्निशमन विभागाच्या नियम व अटींची पूर्तता करून सुरळीत वितरण होईल याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. यावेळी पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अकिल अब्बास, इंडियन ऑईलचे विभागीय प्रबंधक राजीव यादव, वितरण अधिकारी अपेक्षा बडोरिया, हिंदुस्थान पेट्रोलियमचे जॉर्ज थॉमस, भारत पेट्रोकेमिकल्सचे प्रेम सिंग, नगरसेवक सचिन खैरे, असोसिएशनचे सूर्यकांत अंबरवाडीकर, हितेन पटेल, जितेश खुराणा, गणेश दरक, जॅकीस प्रिंटर, अभिजित खैरे यांची उपस्थिती होती.

Web Title: petrol pump owner go to court